गेल्या 7 वर्षांपासून ज्या पणजी शहराचे ‘स्मार्ट सिटी’मध्ये रुपांतर करण्यासाठी जे काम चालू आहे, त्या कामात मोठा घोटाळा झालेला असून, त्या कामाचे विशेष लेखापरीक्षण केले जावे, या मागणीसाठी काल काँग्रेस पक्षाने गोव्याच्या महालेखापालांना (कॅग) एक निवेदन सादर केले. या प्रकरणी सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करतानाच महालेखापाल आणि सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर न्यायालयात जाण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
पक्षाचे प्रवक्ते एल्विस गोम्स आणि जनार्दन भंडारी यांनी पर्वरीतील महालेखापाल कार्यालयात जाऊन तेथील वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील कुमार यांना यासंबंधीचे निवेदन सादर केले.
दरम्यान, सध्या इमॅजिन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडतर्फे विकासकामांसाठी संपूर्ण पणजी शहरातील रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत असून, निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनांना अपघातही होऊ लागले आहेत. मागील काही दिवसांत 4 ट्रकांना अपघात घडले होते.