सीईओ संजीत रॉड्रिग्ज; उर्वरित काही कामे मे महिन्यापर्यंत मार्गी लावणार
पणजी स्मार्ट सिटी मिशनचे काम 31 मार्च रोजी अधिकृतरित्या संपल्याचे काल स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचे सगळे प्रकल्प पूर्ण झाले असल्याचे केंद्राने मान्य केले असून, ते आता फक्त या प्रकल्पांवर अंतिम हात तेवढा फिरवायचा बाकी असल्याचे रॉड्रिग्ज यांनी नमूद केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील सर्व रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. आणि निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण करण्यात आले असल्याचे उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट करण्यात आले असल्याचे रॉड्रिग्ज म्हणाले. मात्र, रस्त्यांवर काँक्रिट घालणे, रस्त्यांचे रंगकाम करणे, ट्राफिक सिग्नल बसवणे, तसेच खोल खोदकाम केल्याने जी तोडफोड झालेली आहे, ती दुरुस्ती करणे हे काम 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय पणजी स्मार्ट सिटीत झाडे लावणे तसेच लँड स्केपिंगचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले.
फक्त ताडमाड रस्त्याचे
काम अपूर्णावस्थेत
पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत काकुलो मॉल, सांतईनेज येथील ताडमाड या रस्त्याचे तेवढे काम अपूर्णावस्थेत असल्याचे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे. हे काम करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागल्याने ते पूर्ण करण्यात अतिरिक्त वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
18 जून, एबी व पीपी मार्ग
हे स्मार्ट सिटी अंतर्गत नाही
18 जून मार्ग, एबी मार्ग व पांडुरंग पिसर्लेकर (पीपी) मार्ग हे मार्ग पणजी स्मार्ट सिटी मिशनखाली येत नसल्याचेही रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. या मार्गांना लागून प्रमुख गटारे असल्याने हे रस्ते स्मार्ट सिटी मिशनचा भाग होऊ शकत नसल्याचे आम्ही यापूर्वीच सविस्तरपणे स्पष्ट केले असल्याचे रॉड्रिग्ज
म्हणाले. गोवा सरकारने त्याची दखल घेतलेली असून, या रस्त्यांची कामे करण्यासाठी 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करण्यात आली असल्याचे रॉड्रिग्ज म्हणाले.
1 एप्रिल 2025 नंतर आता पणजीतील रस्ते बंद करणे, बॅरिकेड्स घालणे, रस्त्यांचे खोदकाम करणे अशी कामे पणजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार नसल्याचेही संजीत रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. जर तशी कामे कुठेही दिसली, तर त्या कामांचा आणि स्मार्ट सिटीचा काहीही संबंध नाही, असे समजावे, अशी पुस्तीही रॉड्रिग्ज यांनी जोडली.