>> मुख्यमंत्र्यांची माहिती; कंत्राटदारासह संबंधित सर्व खात्यांसमवेत आढावा बैठक
पणजी स्मार्ट सिटीची सर्व प्रमुख कामे येत्या 15 जूनपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर काल व्यक्त केला.
पणजी शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने आगामी पावसाळ्यात पणजी शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पणजी स्मार्ट सिटीमध्ये कामे करणारे सर्व कंत्राटदार, जलस्रोत खाते, सल्लागार, विभागप्रमुख, जिल्हाधिकारी आदींसोबत बैठक घेतली. या बैठकीला पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती.
या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. कंत्राटदारांना दिवस रात्र पाळ्यांमध्ये काम करून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कामे जलद गतीने काम करण्यासाठी आवश्यक तेवढे कामगार घ्या आणि काम जलद करण्यासाठी लहान निविदा जारी करा, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्यात 8 जूनपर्यंत पाऊस अपेक्षित आहे, तोपर्यंत सर्व मोठी कामे आणि जोडण्या पूर्ण केल्या जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पणजीतील मुख्य मलनिस्सारण जलवाहिनी बदलण्यात आल्याने मुख्य रस्ते खचू शकतात, अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रातील कामे आणि आजूबाजूच्या भागातील कामे यांच्यात समन्वयाचा अभाव हे या समस्येचे एक कारण आहे. त्याचवेळी जोडणीच्या कामाचीही निविदा काढणे गरजेचे होते, असे मत व्यक्त केले. पणजीत पूर येऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे. मळा येथे नवीन उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन आणि गेट बसवण्यात आल्याने पणजीतील मळा भागातही यावेळी पूर येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘स्मार्ट सिटी’वर संजीत रॉड्रिगीस यांची नियुक्ती
राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पणजी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी संजित रॉड्रिगीस यांची नियुक्ती केली आहे. स्मार्ट सिटीची विविध कामे रखडल्याने पावसाळ्यात पणजी पाण्याखाली जाण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुव्यवस्थित करण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून राज्य सरकारने संजित रॉड्रिगीस यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी पणजी महानगरपालिका, अमृत मिशन व इतर प्रकल्प हाताळले आहे. स्मार्ट सिटीचे काम रुळावर आणण्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.