>> कळंगुट-कांदोळी ओडीपी हरकतींसाठी खुले
मागील भाजप आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेले पणजी, वास्को, फोंडा या प्रमुख शहरांचे बाह्य विकास आराखडे (ओडीपी) नव्याने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मडगाव शहराचा बाह्य विकास आराखडा नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, कळंगुट – कांदोळी बाह्य विकास आराखडा (ओडीपी) जनतेच्या हरकती, सूचनांसाठी बुधवारी खुला करण्यात आला आहे.
पणजी, फोंडा, मडगाव, वास्को या प्रमुख शहरांचे बाह्य विकास आराखडे तयार करताना योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या ओडीपीबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. पणजी ओडीपीच्या विरोधात न्यायालयात याचिकासुध्दा दाखल करण्यात आलेली आहे. मडगाव आणि फोंड्याच्या ओडीपीचा विषय बराच गाजला होता. मडगाव वगळता इतर प्रमुख शहरांचे बाह्य विकास आराखडे रद्द करण्याचा निर्णय नगरनियोजन खात्याने घेतल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रमुख शहरांचा ओडीपी रद्द करून नव्याने तयार करण्याची घोषणा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कळंगुट – कांदोळी ओडीपी नागरिकांच्या हरकतींसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांना ओडीपीबाबत सूचना सादर करण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यासंबंधी माहिती सूचना उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने बुधवारी जारी केली आहे. नागरिकांनी लेखी स्वरूपातील हरकती प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. मडगाव शहराचा ओडीपी तयार करताना योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. स्थानिक नगरपालिकेला ओडीपीचा मसुदा हरकतीसाठी देण्यात आला नाही. दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने मडगावचा ओडीपी नव्याने तयार करण्याचे काम सुरू केले आहे.