४३ लाखांचे नुकसान; घातपाताची शक्यता व्यक्त
पणजी महापालिकेच्या मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर काल पहाटे ३.२० वा. लागलेल्या आगीत तेथील ३८ छोटे खुले गाळे जळून खाक झाले. पणजी अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत भाजी, फळे व देव पुजेचे साहित्य विकणारे गाळे जळून खाक झाले. या आगीमुळे अंदाजे ४३ लाख रु.चे नुकसान झाल्याचे पणजी अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी रुपेश सावंत यांनी सांगितले.अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे ३.२० वा. समीर नावाच्या व्यक्तीने फोन करून या आगीची माहिती दिल्यानंतर दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग मोठी असल्याने नंतर दलाच्या मुख्यालयातून दोन अतिरिक्त बंब आणण्यात आले. आग सर्वत्र पसरू नये यासाठी एकच वेळी तीन बाजूनी आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. आग आटोक्यात आणण्यास खात्याच्या जवानांना दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणली नसती तर आग सर्वत्र पसरली असती. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नसून पोलीस त्याबाबत तपास करीत आहेत. महापालिकेचे कामगार संपावर असल्याने काल दुर्घटना स्थळी सुरक्षा रक्षक नव्हते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या गैरहजेरीचा फायदा उठवत कुणी मुद्दाम ही आग लावली असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे रुपेश सावंत यांनी स्पष्ट केले. मार्केट इमारतीला दरवाजा नसून फक्त फाटक आहे. या फाटकातून कुणीतरी काडी पेटवून आत टाकली असू शकते, असेही ते म्हणाले.
या आगीत आनंदी कुंकळ्ळकर, पार्वती काणकोणकर, फाल्कन डिमेलो, सुजाता बोरकर, रणजीत शिरोडकर, लक्ष्मी कासार, शकुंतला शिरोडकर, कमलावती आसकोणकर, विजय कुंकळ्ळकर, सुनीता बोरकर, महेश मुरगांवकर, आबेलें कुट्टीकर, जमीर बलेगाय, बी.बी. आयेशा बायडगी, रवी टुन्स्कूल, मौला अली मुल्ला, कलावती नाईक, हसन मियॉं नारंगी, जमीर नारंगी, गुणा कुंकळ्ळकर, विष्णू आमोणकर, शाम डिचोलकर, रशीद नारंगी, सनी हलदेवाले, सलिमा दडीमणी, अल्लाबरु देसनूर, महादेव ज्वारे, मुबारक अली खत्री, जुझे फर्नांडिस, सुनीता नाईक, एफ्टेफानिया डिसोझा, रेजिना डिसोझा, अबु अबुसालेहा बायडगी, रत्ना मंगेशकर, फसल्लमी मुल्ला, हजरत अली बलेकाय व महादेव शिरोडकर यांची दुकाने जळून खाक झाली.