पणजी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्या सोडविणार

0
107

>> मनपा महापौरांचे कॉंग्रेस शिष्टमंडळाला आश्‍वासन

महानगरपालिकेच्या मुख्य मार्केटमधील विक्रेत्यांना भेडसावणार्‍या वीज, अस्वच्छता व इतर समस्या सोडविण्याचे आश्‍वासन महानगरपालिकेचे महापौर विठ्ठल चोपडेकर, आयुक्त अजित राय यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला काल दिले.

कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ‘जन गण मन’ या नमन गोंयकारा या अभियानाच्या अंतर्गत येथील मार्केटला भेट देऊन विक्रेत्यांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दिले होते. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मार्केटमधील विक्रेत्यांच्या प्रतिनिधीसह महानगरपालिकेचे महापौर विठ्ठल चोपडेकर, आयुक्त अजित राय यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मार्केटमधील विक्रेत्यांना भेडसावणार्‍या समस्या मांडल्या.

महानगरपालिका प्रशासन मार्केटमधील विक्रेत्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर गंभीर आहे. मार्केटच्या बाहेर पदपथांवर बसून वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असे आयुक्त राय यांनी सांगितले.
मार्केटच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वीज, पंख्यांची समस्या सोडविली जाणार आहे. मार्केटच्या बाहेर बेकायदा बसणार्‍या विक्रेत्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापौर चोपडेकर यांनी सांगितले.

मार्केटमधील विजेची समस्या पुढील पंधरा दिवसात सोडविण्यात येणार आहे. खराब झालेल्या बल्बच्या जागी नवीन बल्ब बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, असे मनपा मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने महापौर आणि आयुक्त यांच्यासमोर विक्रेत्यांना भेडसावणार्‍या समस्या मांडल्या आहेत. त्यांनी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मनपा प्रशासनाकडून आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास पुढे आवश्यक कृती केली जाणार आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.र