>> १ कोटींचा पहिला हप्ता देण्याची हमी
पणजी महानगरपालिकेने मार्केटच्या ५ कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलाच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता १५ ऑक्टोबरपर्यंत भरण्याची हमी दिल्यानंतर शनिवारी मार्केटची वीज जोडणी पूर्ववत केली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.
वीज खात्याने महानगरपालिकेच्या मार्केटच्या वीज बिलाच्या थकबाकीच्या रकमेचा भरणा न केल्याने १ ऑक्टोबरला मार्केटची वीज जोडणी तोडली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वीजमंत्री नीलेश काब्राल यांना मार्केटची वीज जोडणी पुन्हा करून देण्याची सूचना २ ऑक्टोबरला केली. परंतु, अद्यापपर्यंत वीज जोडणी पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. तूर्त, महानगरपालिकेने मार्केटमध्ये जनरेटरच्या साहाय्याने विजेची सोय उपलब्ध केली आहे.
वीज मंत्री नीलेश काब्राल यांची महानगरपालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रीगीस यांनी काल भेट घेऊन मार्केटच्या थकीत वीज बिलाच्या प्रश्नावर चर्चा केली. मंत्री काब्राल यांनी वीज बिलाची थकबाकीची रक्कम हप्त्याहप्त्यांनी भरण्याची सूचना केली असून १ कोटी रुपयांचा पहिला हप्ता भरण्याची सूचना केली आहे. ही रक्कम भरल्यानंतर वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली आहे.
पणजी महानगरपालिकेला मार्केटच्या वीज बिलाची ५ कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी हप्त्याची तरतूद केली जाऊ शकते. मात्र, वीज बिलाच्या रकमेत कमी होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.