>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
पणजा महानगरपालिका क्षेत्र, तसेच ताळगाव, दोनापावल या भागात प्रवासी मार्गावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर फक्त इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली. पणजी परिसरातील डिझेलवरील सर्व बसगाड्या बदलून इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. पणजी परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या अन्य मार्गावर वळविण्यात येणार आहेत, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी माझी बस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये आत्तापर्यंत 63 खासगी बसगाड्या सहभागी झाल्या आहेत. राज्यातील विविध भागातील खासगी बसगाड्या आगामी काळात माझी बस योजनेमध्ये सहभागी होतील, असा विश्वास मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केला.
सरकारचे राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्यांना चालना देण्याचे धोरण आहे. कदंब महामंडळाच्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक केल्या जाणार आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
कदंब महामंडळाकडून डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. राज्यातील कदंब बसस्थानकांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून राज्यात बसपोर्ट उभारणीसाठी सहकार्य मिळत आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.