पणजी महापालिका कर्मचार्‍यांची निदर्शने

0
94

पणजी महापालिकेच्या सेवा खंडित केलेल्या पाच ज्येष्ठ पर्यवेक्षकांना तीन महिन्यानंतरही कामावर रूजू करून न घेतल्याच्या निषेधार्थ काल दुपारी महापालिकेचे कर्मचारी व कामगारानी महापालिकेबाहेर काळ्या फिती लावून निदर्शने केली. ज्येष्ठ पर्यवेक्षकांना महापालिका जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत रोज दुपारी १२.३० ते २ या दरम्यान महापालिकेचे कर्मचारी व कामगार महापालिकेबाहेर वेगवेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करणे चालू ठेवणार असल्याचे कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल सांगितले. यापुढे एका दिवसाचे लाक्षणिक धरणे, लाक्षणिक उपोषण, जाहीर सभा आदीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यानी यावेळी दिली. सेवा खंडित केलेल्या पर्यवेक्षकाना ज्येष्ठता यादीत खाली आणण्यात आले असून त्यांच्यापेक्षा कनिष्ठाना त्यांच्यापेक्षा वर आणण्यात आले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सर्व मागण्यांबाबत महापौर सुरेंद्र फुर्तादो व महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांना यापूर्वीच निवेदने सादर करण्यात आली असल्याचे राणे यांनी सांगितले.