पणजी महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी पायाभरणी

0
8

पणजी महानगरपालिकेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. 75 कोटी रुपये खर्चून ही नवी इमारत बांधण्यात येणार आहे. ह्या इमारतीसाठीच्या पहिल्या टप्प्याचे काम दीड वर्षांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती यावेळी महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

महापालिकेच्या कार्यालयासाठीची
ही इमारत 14 हजार 700 चौरस मीटर एवढ्या जागेत बांधण्यात येणार आहे. तळघर, चार मजले व इमारतीसमोर 600 चौरस मीटर एवढ्या जागेत ‘ओपन सेंट्रल प्लाझा’ असेल. येथे 250 चारचाकी गाड्या पार्क करून ठेवण्यासाठी जागा असेल.

या इमारतीत पणजी महापालिकेच्या कार्यालयाबरोबरच अन्य व्यवसायिक कार्यालये व दुकाने असतील. त्याशिवाय एक प्रमुख सभागृहही असेल.
जुनी इमारत मोडून त्या जागी ही इमारत बांधण्यात येणार असल्याने ह्या इमारतीतील दुकानदारांना तात्पुरते एका दुसऱ्या जागेत हलवण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी 25 नोव्हेंबर 2021 रोजीही महापालिकेच्या नव्या इमारतीसाठी पायाभरणी करण्यात आली होती. याविषयी महापौरांना विचारले असता ते म्हणाले की, तेव्हा ह्या इमारतीचा काही भाग पाडून तेवढ्यापुरतीच इमारतीची नव्याने बांधणीचा विचार होता; मात्र ते योग्य होणार नसल्याचे दिसून आल्याने आता पूर्ण इमारत पाडून वाढीव जागेत विस्तारित इमारत बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.