पणजी महानगरपालिकेकडून 120 कोटींचा अर्थसंकल्प सादर

0
5

पणजी महानगरपालिकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 120 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून, विविध विकासकामांसाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीनंतर बोलताना काल दिली.
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 30 कोटी रुपये अधिक आहे. यंदा महापालिकेला सुमारे 120 कोटींचा महसूल, तर 118 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. करंजाळे येथील मासळी बाजार आणि बालोद्यान, सांतिनेझ येथील दफनभूमी व अन्य ठिकाणी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. तसेच, अन्य ठिकाणी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत, असेही रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

नॅशनल थिएटर, पणजी मार्केटमधील लिव्ह अँड लायसेन्स करार अशा प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेची नवीन इमारत बांधकाम करण्यापूर्वी जुन्या इमारतीतून कार्यालये अन्यत्र हलवणे आवश्यक आहे. यासाठी तात्पुरती जागा शोधण्याचे काम सुरू आहे. लोकांना सोयीची ठरेल अशी जागा शोधली जात आहे, असेही महापौरांनी सांगितले.

पणजी मार्केटमधील लिव्ह अँड लायसेन्स कराराचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. गाळेधारकांना त्यांची मूळ कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. लिव्ह अँड लायसेन्सद्वारे महापालिकेला 30 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, अशी माहिती आयुक्त क्लेन मदेरा यांनी दिली.
दरम्यान, विरोधी गटातील नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. 2025-26 चा अर्थसंकल्प केवळ कॉपी-कट-पेस्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.