पणजी मनपाकडून आजपासून थकित करवसुली

0
6

पणजी महानगरपालिका गुरुवार दि. २० ऑक्टोबरपासून कर थकबाकीच्या वसुलीसाठी मोहीम सुरू करणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ५० टक्के रहिवासी घरपट्टी आणि व्यावसायिक कराचा भरणा करत नाही. प्रति महिना सुमारे २ कोटी थकबाकीची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी महानगरपालिका मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पणजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आणि दुकानदारांशी करार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात जीएसआयटीसीकडे नोंदणी असलेल्या व्यापार्‍यांशी करार केला जाणार असून, त्यांच्याकडून थकबाकी वसूल केली जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील मिरामार परिसरात नवीन पे पार्किंग सुविधा सुरू करण्यास मनपा मंडळाच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. नवीन बहुउद्देशीय इमारत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा शुभारंभ केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात जुन्या बीएसएनएल कार्यालयाच्या बाजूने नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. या संकुलाच्या ठिकाणी अनेक व्यावसायिक कार्यरत आहेत. इमारत बांधकामासाठी त्यांच्याशी सामंजस्य करार केला जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.