पणजी-मडगाव महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने तेथे होणारी मेगा ब्लॉकची समस्या सोडवण्यासाठी सरकारने रस्त्याची दुरुस्ती केलेली असली तरी अजूनही काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
रविवारी सुटीचा दिवस असूनही या रस्त्यावर वेळोवेळी १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. मडगावहून पणजीच्या दिशेने येणार्या वाहनाना जास्त करून ह्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या मार्गावर आगशी येथे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. शिवाय कुठ्ठाळी जंक्शनपासून आगशीपर्यंत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहे. पण असे असूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटू शकलेला नसल्याची लोकांची तक्रार आहे.
वरील ठिकाणी सुमारे ५०-६० पोलिसांना तैनात करण्यात आलेले असले तरी हे पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यात लक्ष घालून समस्या पूर्णपणे सुटेल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.