पणजी-बेती फेरीबोट भरकटली

0
115

>> मदतीस आलेली फेरीबोटही चिखलात रुतली

>> वाहनचालक व प्रवाशांकडून संताप

पणजी ते बेती या जलमार्गावरील प्रवासी व वाहनांनी भरलेली ‘मांडवी’ नामक फेरीबोट काल गुरूवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास जोरदार वारा व पावसामुळे भरकटल्याने खळबळ उडाली. अखेर भरकटलेली फेरीबोट चिखलात रूतल्याने प्रवाशांनी सुस्कारा सोडला. रूतलेल्या फेरीबोटीतील प्रवाशांना मदतीसाठी आणण्यात आलेली दुसरी फेरीबोटसुद्धा बंद पडून चिखलात रूतून पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मरीन पोलिसांनी फेरीबोटमधील २५ च्यावर प्रवाशांची सुखरूप सुटका केली. मात्र फेरीबोटमध्ये असलेल्या दुचाकीचालकांनी फेरीबोटमधून बाहेर येण्यास नकार दिला. त्यावेळी थोडावेळ तणावही निर्माण झाला.

या घटनेमुळे राज्य सरकारची आपत्ती व्यवस्था साहाय्य यंत्रणा कुचकामी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रूतलेली फेरीबोट ओढण्याची यंत्रणा अग्निशामक दलाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल गुरूवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास जोरदार वारा व पावसाला सुरूवात झाली. पणजी ते बेती या जलमार्गावरील फेरीबोटीमध्ये नेहमी प्रवाशांची गर्दी असते. पणजी येथील फेरीधक्क्यावरून बेतीला जाणारी मांडवी ही प्रवासी व वाहनांनी भरलेली फेरीबोट किनार्‍यापासून काही अंतरावर नदीत गेल्यानंतर जोरदार वार्‍यामुळे भरकटल्याने फेरीबोटमधील प्रवाशांची भंबेरी उडाली. प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. भरकटलेली फेरीबोट कांपालच्या दिशेने जाऊन चिखलात रूतल्याने प्रवाशांनी सुस्कारा सोडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि मरीन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरूवात केली. मरीन पोलिसांनी फेरीबोटमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना आपल्या बोटीतून धक्क्यावर आणून सोडले.

फेरीबोटमध्ये वाहने असलेल्या प्रवाशांची फार पंचाईत झाली. वाहन चालकांना फेरीबोटमधून सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी केली होती. परंतु. वाहनचालकांनी फेरीबोटमधून बाहेर पडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मांडवी नदीला भरती आल्यानंतर रात्री उशिरा ही फेरीबोट बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.
पणजी ते बेती या जलमार्गावरील फेरीबोट भरकटण्याची घटना घडलेली आहे. या जलमार्गावर जुनाट फेरीबोटी चालविण्यात येत आहेत, अशी प्रवाशांची तक्रार आहे.