“राजधानी पणजी स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न दाखवून जी अनिर्बंध खोदकामे शहरात जागोजागी केलेली आहेत आणि जी तथाकथित विकासकामे व सुशोभीकरणाची कामे घाईगडबडीत उरकण्यात आली आहेत, त्यांचे येत्या पावसाळ्यात काय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही’ असे आम्ही काही महिन्यांपूर्वी पणजीला आलेले नरकपुरीचे स्वरूप पाहून म्हटले होते. गेल्या दोन दिवसांत मोसमी पावसाच्या मुसळधार सरींनी पणजीला झोडपून काढले आणि तथाकथित स्मार्ट सिटीच्या तोऱ्याचा पार बोऱ्या वाजला. पावसाने संततधार धरताच काही तासांतच शहरातील सर्व प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले, गटारांतील सांडपाणी रस्त्यावरील पाण्यात मिसळले, शेजारच्या घरांत, दुकानांत शिरले. अठरा जून रस्ता आणि मळा भागात यापूर्वीही अनेकदा मुसळधार पाऊस होताच हे घडत असे, परंतु यावेळची परिस्थिती गंभीर होती. अठरा जून रस्त्यावर एवढे पाणी साचलेले पहिल्यांदाच पाहायला मिळाले. पणजीत गेल्या 24 तासांत आठ इंच पाऊस पडला हे तर या साऱ्या वाताहतीचे कारण आहेच, परंतु ते तेवढेच कारणही नाही. तथाकथित स्मार्ट सिटी बनवण्याच्या नावाखाली पणजीत जी बेबंदशाही गेले काही महिने चालली, त्याची ही भीषण परिणती आहे. लोकांच्या घरादारांत आणि दुकानांत पाणी शिरले तेव्हा कुठे गेली सरकारची सुसज्जता? कुठे गेले ते आपदा मित्र आणि आपदा सख्या? घाईघाईने डांबरीकरण आणि हॉटमिक्स केलेले रस्ते अक्षरशः खचत आहेत. धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. त्यावरून जसजशी अवजड वाहने जातील, तसतसे ते अधिकाधिक घातक बनतील. आम नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. पणजीत विकासकामे सुरू असताना किमान पाच अवजड वाहने अपघातग्रस्त झाली होती. काही कामगारांचा तर हकनाक जीवही गेला. परंतु स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेली अनागोंदी दूर झाली नाही. धूळ आणि खड्ड्यांच्या त्रासाने हैराण झालेली जनता राजकारण्यांना शिव्याशाप देऊ लागताच पणजीच्या आमदाराने आधी आपली जबाबदारी ढकलत हात वर केले. वास्तविक, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड ही जे स्पेशल पर्पझ वेहिकल कंपनी सरकारने खास या कामांसाठी स्थापन केलेली आहे, तिच्या संचालकपदावरही ते आहेत. परंतु तरीही त्यांनी जबाबदारी झटकली. त्यांनी तसे करताच पणजीचे महापौर असलेले त्यांचे पुत्र तरी कसे मागे राहतील? त्यांनीही महापालिकेवरील जबाबदारी नाकारली. राजकारण्यांनी अभियंत्यांवर खापर फोडले आणि अभियंत्यांनी कंत्राटदारावर. कंत्राटदार कामे आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पावसाळा तोंडावर आल्याचे निमित्त करून यंत्रसामुग्रीसह परागंदा झाला. शेवटी मुख्यमंत्र्यांना स्वतः मैदानात उतरावे लागले. स्वतः सर्वत्र फिरून पाहणी करावी लागली. दोन पाठपुरावा बैठका घ्याव्या लागल्या, तेव्हा कुठे अर्धवट सोडून दिल्या गेलेल्या कामांना थोडीफार गती मिळाली. संजित रॉड्रिग्स यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याकडे कारभाराची सूत्रे देण्यात आली, काही रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा देखावा झाला. परंतु मुळात पणजी शहराची भौगोलिक रचना, तिच्याखालील अत्यंत कार्यक्षम अशी पोर्तुगीजकालीन सांडपाणी निचरा यंत्रणा या कशाचाही थांगपत्ता नसलेल्या कंत्राटदारांच्या आणि अभियंत्यांच्या हाती माकडाच्या हाती कोलीत द्यावे तशा पद्धतीने स्मार्ट सिटीच्या कामांची सूत्रे दिली गेल्याने मूळच्या व्यवस्थेचे त्यांनी तीनतेरा उडवले. विशेषतः पणजीच्या सांतिनेज भागाची तर कंत्राटदाराने पूर्ण दुर्दशा करून ठेवली आहे. सांडपाणी वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरभरात असह्य दुर्गंधीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसामुळे हे सगळे गटारांतील गलीच्छ सांडपाणी पावसाच्या पाण्यात मिसळून रस्त्यांवरून वाहिल्याने आरोग्याच्या संदर्भात गंभीर आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या निवासी इमारतीची सांडपाण्याची टाकी वाहू लागली तर आरोग्य खाते नोटीस वगैरे बजावते. आज अवघ्या पणजीत गटारांतील सांडपाणी रस्त्यारस्त्यांतून वाहताना दिसते, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, तर आरोग्य खाते कुठे झोपले आहे? स्मार्ट सिटी बनणे तर दूरच, पणजी शहराची ही जी विल्हेवाट संबंधित बेजबाबदार यंत्रणांनी लावून ठेवली आहे ती खेदजनक आहे. पणजीसह देशातील 98 शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यापैकी जवळजवळ सर्व शहरे स्मार्ट बनली आहेत. त्यांचा चेहरामोहरा केंद्रीय निधीच्या कृपेने पालटला आहे. पणजी मात्र अधिकाधिक ओंगळ आणि गलीच्छ बनून राहिली आहे. याची जबाबदारी आता कोण घेणार? स्मार्ट सिटीची नरकपुरी बनवणारे ओव्हरस्मार्ट कोण आहेत? कुठे आहेत?