९० हजार रु. किमतीचा मावा एफडीएकडून नष्ट
गुजरातहून बसमधून पाठवण्यात आलेला व पणजी कदंब बसस्थानकावर उघड्यावर टाकून देण्यात आलेला ६०० किलो मावा काल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला. ९० हजार रु. किमतीचा हा मावा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम वेलजी यांनी सांगितले.
३० किलोच्या प्रत्येकी २० पिशव्यांमध्ये घालून हा मावा आणण्यात आला होता व त्या पिशव्यांवर स्पेशल बर्फी असे लिहिण्यात आले होते. हा मावा खराब होऊ नये म्हणून तो कोल्ड स्टोरेजमध्ये घालून आणावा लागतो. पण तो तसा न आणता नुसता पिशव्यांमध्ये घालून आणण्यात आला होता.
चतुर्थीच्या दिवसात मिठाईला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन मिठाई बनवण्यासाठी हा मावा आणण्यात आला होता. या माव्याच्या पिशव्यांवर कोणतेही लेबल नव्हते. तसेच तो कोणासाठी पाठवण्यात आलेला आहे त्या व्यक्तीचेही नाव पार्सलवर नव्हते असे वेलजी यांनी सांगितले. हा मावा ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यानी वरील कारवाई केली. ज्या व्यक्तीला हा मावा पाठवण्यात आला होता त्या व्यक्तीची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळू नये यासाठी पार्सलवर मुद्दामहून नाव लिहिण्यात आले नव्हते. आम्ही तो ताब्यात घेतला नसता तर ज्या व्यक्तीला तो पाठवण्यात आला होता. त्या व्यक्तीने माणूस पाठवून तो ताब्यात घेतला असता असे वेलजी म्हणाले.