कॉंग्रेसच्या पणजी गट समितीच्या काल झालेल्या बैठकीत पणजी मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाने आपला उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून संभाव्य उमेदवार म्हणून दोन नावे निवडली. पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो व एझिल्डा सापेको ही ती दोन नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौर फुर्तादो यांचे पारडे जड दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजीतून कॉंग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण ऐन वेळी पक्षाने आपली उमेदवारी यतिन पारेख यांना दिल्याने त्यांची निराशा झाली होती. काल त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यास नकार दिला.