>> स्मार्ट सिटीमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेचा उद्देश
पणजी स्मार्ट सिटीमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने सिटीमधील सुमारे ६० हजार नागरिकांना मोफत स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बाजारातील खरेदी, सरकारी बिलांचा भरणा, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, कदंब बस वाहतुकीमध्ये आदी सुविधांसाठी या स्मार्ट कार्डांचा वापर केला जाऊ शकतो.
येत्या ३० जुलै रोजी स्मार्ट कार्ड वितरणाला सुरुवात केली जाणार आहे. या स्मार्ट कार्डांसाठी नागरिक व व्यापार्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत. या स्मार्ट कार्डांसंबंधी व्यापारी वर्गात जागृती करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात काल संध्याकाळी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्मार्ट सिटीचे संचालक सिद्धार्थ कुंकळ्येकर, व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्त पाल चौधरी, जीसीसीआयचे अध्यक्ष संदीप भंडारे, नगरसेविका वैदेही नाईक, मनोज पाटील यांची उपस्थिती होती.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एका खासगी बॅँकेशी करार केला आहे. या बँकेच्या माध्यमातून कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा असेल. ऑनलाइन पद्धतीने कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्मार्टकार्ड घेणार्या नागरिकाला आगाऊ पैसे भरून कार्ड रिचार्ज करावे लागणार आहेत. कुठल्याही बँकेतून या कार्डावर पैसे भरण्याची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली. बॅँकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डापेक्षा स्मार्ट कार्ड वेगळे आहे. स्मार्टकार्ड तीन प्रकारांमध्ये तयार केली जाणार आहेत. पहिले कार्ड स्थानिक नागरिकांसाठी वापरण्यासाठी असेल. देशी पर्यटक आणि विदेश पर्यटक यांच्यासाठी दोन वेगळ्या रंगाची कार्डे तयार केली जाणार आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.
आगामी काळात कार्ड आधार कार्डाशी जोडले जाऊ शकते. या कार्डाच्या रिचार्जची प्रक्रियासुद्धा सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. एखाद्या नागरिकांचे कार्ड गहाळ झाल्यास संबंधिताशी त्वरित संपर्क साधून कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
सरकारच्या ई गव्हर्नर सेवेसाठी कार्डाचा वापर केला जाऊ शकतो. पीओएस आणि एटीएम, सार्वजनिक सायकल सुविधा, आरोग्य सुविधा, मनोरंजन सुविधा, स्मार्ट सोयी सुविधांसाठी वापर केला जाऊ शकतो. या कार्डाच्या वापरासाठी पीओएस मशीन बसविणार्या व्यापार्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कार्ड वापरासाठी एमडीआरची आकारणी केली जाणार नाही, असेही चौधरी यांनी सांगितले.
कार्डाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कार्डाचा वापर करणार्या नागरिकांना सोबत रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. नागरिकाला अनेक कार्डे जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. एका स्मार्ट कार्डाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे व्यवहार केले जाऊ शकतात, असेही चौधरी यांनी सांगितले.