पणजीत ५०० कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू

0
61

गोवा सरकारपुढे ठेवलेल्या आमच्या १४ विविध मागण्यासंबंधी सरकारने काहीही केले नसल्याच्या निषेधार्थ गोवा भारती आणि रोजगार सोसायटीच्या सुमारे ५०० कामगारांनी कालपासून पणजीत बेमुदत उपोषण सुरू केले. आपणाला सेवेत सामावून घेऊन कायम करावे, तसेच ३ ते ४ हजार हा तुटपुंजा पगार वाढवून १५ हजार रु. एवढा पगार द्यावा या महत्वाच्या मागण्यासाठी या कामगरांनी आता बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. काल सकाळी येथील बंदर कप्तान इमारतीसमोर या कामगारांनी हे उपोषण सुरू केले. मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे या कामगारांचे नेते अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी काल सांगितले.मागण्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, कामगार मंत्री आवेर्तान फुर्तादो, कामगार आयुक्त तसेच अन्यांना यापूर्वीच देण्यात आलेले आहे. पण कुणीही या निवेदनाची साधी दखलही घेतली नसल्याचे राणे यांनी सांगितले. २७ ऑक्टोबर रोजी या कामगारानी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा नेऊन त्यांना निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चर्च स्क्वेअर जवळ अडवण्यात आले होते. नंतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांच्या गैरहजेरीत सादर केले होते, असे राणे यांनी सांगितले.