दोन टप्प्यांत अमलबजावणी
पणजी शहरातील वाहतूक कोंडीची व पार्किंगची समस्या नाहीशी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील विविध रस्ते हे पे पार्किंग करण्याच्या व काही रस्ते ‘वन वे’ बनवण्यासाठीच्या योजनेला काल महापालिका मंडळाच्या बैठकीत तत्त्वता मान्यता देण्याचा ठराव संमत करण्यात आला. मात्र, काही नगरसेवकांनी केलेल्या सूचनावरून या योजनेची दोन टप्प्यात अमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले. महापालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी प्रथम या योजनेविषयीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करताना सविस्तर माहिती दिली.
शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून तेथे पे पार्किंगची सोय करण्याचा प्रस्ताव असल्याचे, तसेच काही रस्ते हे एकतर्फी करण्याची योजना असल्याचे यावेळी रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. पणजी शहरातील वाहतुकीची कोंडी नाहीशी करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही रस्ते हे एकमार्गीच करावे लागतील, असे यावेळी रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. शहरातील काही रस्त्यांचे पार्किंगमध्ये रुपांतर करण्याची योजना असून त्यात विशाल मेगामार्ट समोरचा रस्ता, डॉन बॉस्को हायस्कूल ते दादा वैद्य इस्पितळ दरम्यानचा रस्ता, नेपच्यून हॉटेल ते देना बँक या दरम्यानचा रस्ता, महालक्ष्मी मंदिर ते नोवा गोवा हॉटेल, नवहिंद टाइम्सच्या समोरचा रस्ता ते कामत सेंटर, विद्युत भवन ते आजाद मैदान या दरम्यानचा मार्ग यांचा समावेश असल्याचे रॉड्रिग्ज यांनी यावेळी स्पष्ट केले.
बहुस्तरीय पार्किंग
शहरातील काही ठिकाणी बहुमजली पार्किंगची योजना असून नॅशनल थिएटर इमारतीचे बहुस्तरीय पार्किंग इमारतीत रुपांतर करण्याची योजना आहे. नागरी पुरवठा खात्याचे जुन्ता हाऊसमागे असलेले गोदाम तेथून हलवून तेथे पार्किंगची सोय करण्याचा प्रस्ताव आहे. डॉन बॉस्को स्कूल विरुध्द असलेल्या पीडब्ल्यूडी गॅरेजचा विभागही पार्किंगसाठी वापरण्याची योजना आहे. काही मोकळ्या जागाचाही पार्किंगसाठी वापर करण्याची योजना आहे. गोविंद इमारतीजवळ असलेल्या गार्डनचा त्यासाठी वापर करण्याचा विचार आहे.
जास्त वर्दळ नसलेल्या काही रस्त्यांचा दुचाकी पार्किंगसाठी वापर करण्याचा विचार आहे. म्हामाई कामत यांचे घर ते तातो हॉटेल दरम्यानचा रस्ता, पोशाख शोरुम ते डिचोली अर्बन बँक या मार्गावरही दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्याचा विचार आहे. नव्या इमारतींनी पार्किंगसाठी जागा ठेवावी त्यासाठी नवे पोटकायदे तयार करण्याची योजना असल्याचे रॉड्रिग्ज यांनी यावेळी स्पष्ट केले.