>> दुकानांत शिरले पाणी; राजधानीतील रस्ते जलमय; गटारे तुंबली;
>> दिवाळीनिमित्त सामान खरेदी-विक्रीसाठी आलेल्या ग्राहक-व्यापाऱ्यांची धांदल
काल सायंकाळी 7 च्या सुमारास राजधानी पणजीसह विविध भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध सामान विक्रीस घेऊन आलेले व्यापारी, ग्राहक, तसेच नरकासूर प्रतिमा तयार करणाऱ्या युवकांची तारांबळ उडाली. पणजीमध्ये साधारण तासभर पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबले. पणजीत साधारण तासाभरात पावणे तीन इंच (2.75 इंच) पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
काल सायंकाळी राज्यात दमट व ढगाळ वातावरण होते; पण मोठा पाऊस कोसळेल, अशी सुतरामही शक्यता नव्हती. येथील हवामान विभागाने देखील सोमवारी पावसाची शक्यता वर्तवली नव्हती. हवामान विभागाने राज्यात 30 आणि 31 ऑक्टोबरला पावसाची शक्यता व्यक्त करून एलो अलर्ट जारी केला होता. मात्र काल तासाभरात कोसळलेल्या पावसाने भंबेरी उडवली. सायंकाळी 7 च्या सुमारास सुरू झालेला अवकाळी पाऊस मान्सूनप्रमाणे धो-धो कोसळला. त्याबरोबर सोसाट्याचा वाराही सुटल्याने काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. जोरदार पावसामुळे पणजीमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याने नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय झाली. याशिवाय काही दुकानांमध्येही पाणी शिरले. दिवाळीनिमित्त विविध साहित्य घेऊन विक्रीस आलेल्या व्यापाऱ्यांनाही जोरदार पावसाचा फटका बसला. त्याचबरोबर दिवाळीच्या सामान खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही धांदल उडाली. व्यापाऱ्यांचे सामान भिजल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले.
फोंडा, तिसवाडी, मुरगाव व इतर तालुक्यांत जोरदार वारा आणि विजेच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटनांची नोंद झाली. आल्तिनो-पणजी येथे झाड मोडून रस्त्यावर पडल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
अवकाळी पावसामुळे नरकासुर भिजले
दिवाळीसाठी नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे काम देखील ठिकठिकाणी सुरू आहे. नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमा भिजल्याने त्या खराब झाल्या आहेत. काही जणांनी नरकासूर प्रतिमा पावसात भिजण्यापासून वाचविण्यासाठी प्लास्टिकचा आधार घेतला.