पणजी
हौशी ज्येष्ठ कलाकारांना आपल्या अंगभूत कलांच्या आविष्कार करण्याची संधी देणारा ‘ज्येष्ठांची धम्माल २’’ हा कार्यक्रम’ आयोजित करणारे गोवा आर्ट सर्कलचे शशिकांत सरदेसाई आणि ऍड. सुभाष सावंत हे अभिनंदनास पात्र असून अशाप्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित करावे, असे उद्गार गोव्याचे माजी ऍडव्होकेट जनरल (अधिवक्ता) ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश लोटलीकर यांनी काढले. गोवा आर्ट सर्कलने कला आणि संस्कृती संचालनालयाचा सहयोगाने रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठांची धम्माल २’ या कार्यक्रमांत ते बोलत होते.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोवा आर्ट सर्कल या संस्थेने कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गोव्यातील विविध भागातून आलेल्या चाळीस ज्येष्ठ पुरुष आणि महिलांनी यात सहभाग घेऊन गायन – वादन, भजन – कीर्तन, नृत्य – नाट्य, कथा – कविता, विनोद – मिमिक्री आदी कलांचा आविष्कार सभागृहात उपस्थित असलेल्या असंख्य रसिक प्रेक्षकांसमोर करुन त्यांची वाहव्वा मिळविली.आयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. सुभाष सावंत यांनी सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संयोजक शशिकांत सरदेसाई यांच्या खुसखुशीत आणि विनोदी शैलीतील सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत क्षणोक्षणी वाढतच गेली. सर्व उपस्थितांसाठी आयोजकांनाी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.