गोवा विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आले.
भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे नगरसेवक यांची उपस्थिती होती.
सांतइनेज सर्कल ते करंजाळे आणि रूआ द ओरे खाडी, मळा, भाटले ते ताळगाव व दोनापावल रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. पीडब्लूडी गॅरेज, नागरी पुरवठा गोदाम आणि डॉ. ए.बी. रोड येथे मल्टी लेव्हल कार पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे अशी माहिती उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.
रायबंदर येथे मच्छीमारी जेटी, मळा येथे पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी योग्य उपाय योजना, बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाटो प्लाझा येथे सांस्कृतिक विभाग, परेड मैदानावर फुटबॉल स्टेडियम, रायबंदर येथे फुटबॉल मैदान उभारण्यात येणार आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.
पणजी मार्केटच्या तिसर्या टप्प्याचे काम सुरू केले जाणार आहे. सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिला मंडळांना त्यांनी बनविलेले पदार्थ, वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओपा येथील नवीन २७ एमएलडी पाणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. नवीन मलनिस्सारण प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. मतदारसंघाचे सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पणजीच्या विकासासाठी भरपूर योगदान देऊन विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. पर्रीकरांनी राजधानी गुन्हेमुक्त ठेवली, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीचे काम
५ वर्षांनी दिसणार
स्मार्ट सिटीच्या कामावरून विरोधक नाहक आरोप करीत आहेत. स्मार्ट सिटीचे काम पाच वर्षानंतर दिसून येणार आहे. दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पणजी आदर्श शहर विकसित करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदारांनी भाजपला साथ द्यावी, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
‘माझा प्रतिस्पर्धी बाबूश; सिद्धार्थ नव्हे’
>> गोसुमंच्या सुभाष वेलिंगकर यांचा दावा
पणजी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर आपला प्रतिस्पर्धी नाही. तर, कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात प्रतिस्पर्धी आहेत, असा दावा गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार तथा पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.
मांडवीतील कॅसिनो हटविणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, सांतइनेज खाडी आणि वारसा घरांच्या संवर्धनाचे आश्वासन गोसुमंच्या जाहीरनाम्यात दिले आहे.
गोवा सुरक्षा मंचाच्या पणजी पोट निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्यानंतर वेलिंगकर पत्रकारांशी बोलताना वरील दावा केला. भाजप आणि कॉंग्रेसचे नाराज मतदारांचा गोसुमंला पाठिंबा लाभत आहे. मागील पंचवीस वर्षे मनोहर पर्रीकर यांनी पणजीचे प्रतिनिधित्व केले. परंतु, पाणी, वीज, रस्ता या सारख्या मूलभूत सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध करण्यात अपयशी ठरले. भाजप पणजीवासियांना न्याय देऊ शकला नाही, असा आरोप वेलिंगकर यांनी केला. गोसुम मते फोडण्यासाठी निवडणूक रिंगणात नाही. तर जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरला आहे, असा विश्वास वेलिंगकर यांनी व्यक्त केला.
पणजी स्मार्ट सिटीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. या गैरव्यवहाराबाबत पूर्ण माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीतील कामाच्या गैरव्यवहाराबाबत संबंधितांकडे दाद मागितली जाणार आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.
पणजीतील मतदारांना भेडसावणारी पाणी, रस्ते, वीज या सारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. मांडवी नदीतील कॅसिनोची हकालपट्टी करून त्यांना खोल समुद्रात पाठविले जाणार आहेत. तसेच गेमिंग कमिशनरची नियुक्ती करून कॅसिनोच्या व्यवहारावर नियंत्रण आणले जाणार आहे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
पणजीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झोपडपट्टी निष्कासन मंडळाची स्थापना, स्मार्ट सिटीच्या निधीचा योग्य विनियोग करणे, नागरी वाहतूक सक्षम करणे, शहरातील सरकारी कार्यालये आणि गोदामांचे शहराबाहेर स्थलांतर करणे, सरकारी निवासी इमारतीचे नूतनीकरण, पुरातन वारसा घरांचे जतन, मार्केटच्या दुसर्या टप्प्याचे काम आणि मार्केटची आरोग्यदायी देखभाल, पावसाचे पाणी साचणार्या भागात सुनियोजित गटार व्यवस्था, रूआ द ओरे खाडी आणि मळ्यातील तळ्याचे योग्य जतन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास, जुन्या रायबंदर रस्ता, मिठागरे आणि खारफुटींचे जतन व संवर्धन, युवा माहिती केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास योजनेची कार्यवाही, पणजी बसस्थानकावर अत्याधुनिक साधन सुविधा, शहरात बहुमजली पार्किंग व्यवस्था, सांतइनेज खाडीची स्वच्छता, कचर्याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला जाणार आहे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.