पणजीत खासगी बसेसही धावणार

0
7

पणजी स्मार्ट सिटीमध्ये कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्यांबरोबरच खासगी बसगाड्या सुरू राहणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली. राज्य सरकारने पणजी स्मार्ट सिटीमध्ये कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने खासगी बसगाड्या बंदीबाबत आदेश जारी केला होता. त्यामुळे खासगी बसगाड्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालून तो निर्णय बदलण्याची खासगी बसमालकांनी विनंती केली होती. तथापि, राज्य सरकारने खासगी बसमालकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने सुदिप ताम्हणकर गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने पणजी स्मार्ट सिटी योजनेमध्ये सुधारणा करून कदंबाच्या बसेससह खासगी बसेसना चालविण्यास परवानगी देण्यासाठी संबंधित योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे.