पणजीतील हॉटेल व व्यापारी संघटना बंद पुकारणार

0
228

>> मनपाचा कर न भरण्याचा निर्णय

पणजी महापालिका आपल्या विविध करांत दरवर्षी मोठी वाढ करीत असल्याच्या निषेधार्थ पणजीतील हॉटेल व व्यापारी संघटनेने पालिकेचे कर न भरण्याचा नुकत्याच झालेल्या आपल्या बैठकीत निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे निमंत्रक बेर्नाबे सापेको यांनी सांगितले. लवकरच एकदिवसीय बंद व जेलभरो आंदोलन करण्याचाही संघटनेने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेने व्यापारी परवाना शुल्क, कचरा शुल्क, साइनबोर्ड कर, गृहपट्टी यात मोठी वाढ केली असून या वाढत्या कराच्या बोजाने शहरात व्यवसाय करणे कठीण बनले असल्याचे मत संघटनेच्या बैठकीतून व्यक्त करण्यात आले.
महापालिकेने आपले करांचे दर खाली आणावेत. दर वर्षी महापालिका मनमानीपणे करात वाढ करीत आहे, असे मत संघटनेच्या सदस्यानी व्यक्त केल्याचे सापेको यांनी सांगितले.

संघटनेच्या सदस्यानी अन्न आणि औषध प्रशासन यांचे शुल्क, अबकारी परवाना शुल्क, अग्नीेशामक सेवा नूतनीकरण शुल्क आदी वेळच्या वेळी भरावेत. मात्र महापालिकेचे कर भरू नयेत असे संघटनेने आपल्या सदस्यांना सांगितले आहे.

एका दिवसाचा बंद
लवकरच एका दिवसाचा बंद व पणजी महापालिका जेल भरो आंदोलन आयोजित करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. यावेळी गांधीगिरीचे प्रतीक म्हणून महापौरांना गुलाब भेट देण्यात येणार आहे. कर वाढवला जातो. मात्र महापालिकेकडून व्यापार्‍यांना कोणत्याही सोयीसुविधा पुरवण्यात येत नसल्याचे सापेको यांचे म्हणणे आहे.