पणजीतील स्मार्ट सिटीची कामे दर्जेदारच

0
19

>> सीईओ संजीत रॉड्रिग्स यांचा पत्रकार परिषदेत दावा; 35 पैकी 20 प्रकल्पांची कामे पूर्ण; 15 प्रकल्पांची 75 टक्के कामे पूर्ण

स्मार्ट सिटी योजनेअंर्तगत पणजीत सुरू असलेल्या 35 पैकी 20 प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून, शिल्लक 15 प्रकल्पांची कामे 75 टक्के पूर्ण झाली आहेत. पणजी स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा सांभाळता जात आहे. कांपाल परेड मैदान ते अग्निशामक संचालनालयापर्यंतचा रस्ता वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्याबाबत अद्याप एकही तक्रार आलेली नाही. आम्ही आमच्या कामाचे ऑडिट करू शकत नाही. अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेने हे ऑडिट करायला हवे. स्मार्ट सिटीच्या कामांच्या ऑडिटचे आम्ही स्वागत करू, अशी भूमिका स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्स यांनी घेतली. आल्तिनो येथे काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या कामांचा प्रश्न गाजत आहे. काही दिवसांपूर्वी एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर हा विषय आणखीनच पेटला होता. तसेच कामांच्या दर्जाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या एकंदर कामांची माहिती देण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यांनी काल ही खास पत्रकार परिषद घेतली.

राज्य सरकारने पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे. या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्यात आली आहे. अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना वेळेचे बंधन घातले आहे. ठेकेदारांनी कामाच्या ठिकाणी केलेल्या सुरक्षा उपाययोजना समाधानकारक आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर 953.90 कोटी रुपयांच्या 35 प्रकल्पांपैकी 404.20 कोटी रुपयांचे 20 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 531.70 कोटी रुपयांचे 15 प्रकल्प सुरू आहेत, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.

स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता आणि मलनिस्सारणाच्या सुमारे 33 टक्के आणि पाणी पुरवठ्यासंबंधीच्या 19 टक्के कामांचा समावेश आहे. गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात रस्ते स्मार्ट करण्याचे काम सुरू आहे. डॉ. पी. शिवगावकर रस्ता व डॉ. रॉक डिसोझा या दोन रस्त्याची कामे 26 जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.
मलनिस्सारण वाहिनी घालण्याच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. मलनिस्सारण चेंबरसाठी पाच मीटर खोदकाम करावे लागत आहे. एक मीटर खोदकाम केल्यानंतर पाणी मिळते. त्यामुळे चेंबर बांधण्याच्या कामात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.

18 जून रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर एमजी रोडवरील कामाबाबत निर्णय घेतला जाईल. स्मार्ट सिटीमध्ये सर्व प्रकारच्या केबल्स भूमिगत घालण्याची व्यवस्था केली जात आहे. 50 वर्षांपूर्वीची जुनी जलवाहिनी बदलण्यात येत आहे. आत्तापर्यंत 3665 मीटर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले. रस्ते, पदपथ तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे, असेही रॉड्रिग्स म्हणाले.

पूर्ण झालेल्या कामांविषयी कोणत्याही तक्रारी नाहीत
स्मार्ट सिटीच्या कामांबाबत दर्जा सांभाळला जात आहे. वर्षभरापूर्वी काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले होते, त्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. कोणत्याही यंत्रणेमार्फत स्मार्ट सिटीच्या कामाचे दर्जाची तपासणी करण्यास आमची हरकत नाही; मात्र आमच्या कामाचा दर्जा आम्ही तपासू शकत नाही, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.

युवकाच्या मृत्यूवर भाष्य करण्यास नकार
मळा-पणजी येथे 1 जानेवारीला स्मार्ट सिटीच्या मलनिस्सारण खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास संजीत रॉड्रिग्स यांनी नकार दिला. सदर मृत्यू प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण थेट न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.