पणजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे.
गोवा राज्य नागरी विकास प्राधिकरणाने पणजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे जीआयएस आधारित सर्वेक्षण करण्यासाठी नागपूरस्थित कोलब्रो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती केली आहे. नागरिकांच्या मालमत्तेची योग्य पद्धतीने नोंदणी होत नसल्याने कर चुकवेगिरीचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याने राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचे जीआयएस पद्धतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणासाठी गोवा राज्य नागरी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करून एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घर, मालमत्तेला सर्वेक्षण करणाऱ्या या कंपनीचे अधिकारी आणि प्रतिनिधी भेट देतील. या भेटीच्या वेळी नगरपालिका निरीक्षक त्यांच्यासोबत असतील. सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आली आहेत. मनपा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या मालमत्ता सर्वेक्षणासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने
केले आहे.