- शरत्चंद्र देशप्रभू
आज पणजी विस्तारली आहे. गरजेनुसार पदोपदी अत्याधुनिक यंत्रणा असलेली मुद्रणालये आली आहेत. ग्राहकांना तत्पर सेवा मिळू लागली आहे. नवववीन संशोधित पद्धती आणल्या जात आहेत. परंतु पणजीतील मुद्रणाचा इतिहास विसरून कसे चालेल?
छपाई प्रक्रियेने जागतिक स्तरावर फार मोठी क्रांती केली. छपाईचा उगम कुठे, केव्हा व कुणाकडून झाला, याबद्दल विविध विचारप्रवाह अन् संशोधित निष्कर्ष आहेत. काहींच्या मते याचा उगम चीनमध्ये तांग राजवंशाच्या कालावधीत ख्रिस्तानंतरच्या पर्वात झाल्याचे प्रतिपादन केले जाते. बी शेंग याने पहिल्यांदा यांत्रिकी माध्यमाने छपाई केली. याचा प्रसार जपान, कोरिया देशांत झाला. परंतु चीनमधील छपाई मूलतः लाकडी ठोकळ्यांवर होत असे. धातूचा पण वापर केला जात असे. परंतु जोहान्स गुटेनबर्ग या जर्मनीतील सुवर्णकाराच्या नावाला पहिल्या छपाई यंत्राचा शोध लावल्याचे श्रेय दिले जाते. हा शोध 1440 साली लागल्याचे संकेत मिळतात. या शोधाने छपाई यंत्राचा वापर विस्ताराने होऊ लागला. भारतात छापखाना उभारण्याचे श्रेय जेझुईट मिशनरीच्या जुआंन द बस्तामंते ऊर्फ रुद्रिगिश याला जाते. हा स्पॅनिश की पोर्तुगीज याबद्दल वाद आहे. परंतु मिशनरीने पहिला छापखाना ओल्ड गोवा येथील ‘सांतू पावलू कुलेजियू’मध्ये थाटला. काहींच्या मते कोलकाता येथे पहिला छापखाना सुरू झाला. परंतु ओल्ड गोवा येथील छापखाना 1556 साली झाल्याबद्दल दुमत नाही.
या घटनेमुळे गोव्याची छपाईची उज्ज्वल परंपरा अधोरेखित होते. मुक्तीपूर्व गोव्यातील प्रमुख छापखाना म्हणजे सरकारी संस्था ‘इंप्रेसू नासियोनाल.’ हे सरकारसंबंधी छपाई करणारे आस्थापन एकोणिसाव्या शतकात अस्तित्वात आले. यात खासगी कामासाठी छपाई करण्याची तरतूद नव्हती. मुक्तीनंतर 1980 पर्यंत यात जुन्या पद्धतीप्रमाणेच मुद्रण होत असे. कालांतराने ऑफसेट आले, कम्प्युटर टाईपिंग आले. मुक्तीपूर्व पणजीत ‘द हेराल्ड’ अन् ‘हेराल्दू’ ही दोन दैनिके पोर्तुगीज भाषेतून प्रसिद्ध होत. देश-विदेशातील बातम्यांना यातून प्रसिद्धी मिळत असे; परंतु या चारपाच दिवसांनंतर शिळ्या झाल्यावर! कालांतराने ‘मेसर्स जे. डी. फर्नांडिस’ या स्वतःचे अद्ययावत मुद्रणालय असलेल्या आस्थापनाने ‘द हेराल्दू’चे हक्क विकत घेतले. पोर्तुगीज भाषेच्या या दैनिकात आमादेव हे संपादक असावे. तसेच कार्मू आझावेदू हे पण नावाजलेले स्तंभलेखक. तसेच मळा भागातून ‘दियारियू द नोयत’ हे सायंकालीन दैनिक प्रसिद्ध होत असे. चार पृष्ठांच्या या छोट्या सायंकाळी प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाला उदंड प्रतिसाद लाभला तो त्यात येणाऱ्या ताज्या, खमंग बातम्यांंमुळे.
मुक्तीनंतर सरकारी मुद्रणालय प्रकाशझोतात आले ते अर्थसंकल्प गळतीमुळे. एका वर्तमानपत्रात फुटलेला अर्थसंकल्प वृत्तांत झळकल्याने हे सरकारी मुद्रणालय अन् कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याचे स्मरते. फर्नांडिस ग्रुपने ‘द हेराल्द’चे हक्क प्राप्त केल्यावर या वर्तमानपत्राचे स्वरूपच पालटले. इंग्रजी भाषेतून ते प्रसिद्ध होऊ लागले. आरंभीच्या काळात पोर्तुगीज व इंग्रजी. राजन नायरनी या वर्तमानपत्राच्या संपादकपदाची धुरा हाती घेतली अन् आक्रमक शैली वापरून प्रखर लढा दिला, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. हे दैनिक त्यामुळे वाचकप्रिय झाले. अन्यायाचे परिमार्जन कितपत झाले देव जाणे! परंतु वर्तमानपत्राची विक्री वाढली, जाहिरातबाजी वाढली. राजन नायर यांच्यावर झालेला हल्ला हा पण त्यांच्या आक्रमक शैलीचा परिपाक असावा. कालांतराने या संपादकाची समस्या मला मजूर आयुक्तपदी असताना हाताळावी लागली. यासंदर्भात समझोता झाला की विषय औद्योगिक लवादावर सोपवला आता आठवत नाही.
‘गोमन्तक’ हे दैनिक चिंचोळे-भाटले येथून प्रसिद्ध होत असे. हँड कंपोझिंगचा हा छोटा छापखाना कौलारू घरातून चालायचा. कालांतराने याचे स्थित्यंतर सांतइनेज भागात अद्ययावत छपाईयंत्रणा असणाऱ्या ‘गोमन्तक भवन’मध्ये झाले. वृत्तपत्रासाठी असलेल्या मुद्रणालयांना समांतर असा खाजगी छपाईसाठी अस्तित्वात आलेल्या मुद्रणालयांचा प्रवाह पण दिसून येत होता. ‘प्रफुल्ल प्रिटिंग प्रेस’ हे मुद्रणालय ख्रिस्तवासी एदुआर्द दियश चालवत. त्याचबरोबर ‘लुत’ हे साप्ताहिक पोर्तुगीज भाषेतून चालवत. ‘लुत’ म्हणजे युद्ध. हे डायस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे यांच्या प्रेसमध्ये साम्यवादी चळवळीसंबंधीच्या साहित्याचा खच पडलेला दिसे. परंतु हे फुकट असूनही मागणी नव्हती. मात्र डायसना याची ना खंत, ना खेद. निर्विकारपणे ते आपले साम्यवादी चळवळीचे काम करत. याचबरोबर उपजीविकेसाठी छपाईची छोटीमोठी कामे पण स्वीकारत.
पणजीत मजूर निरीक्षकपदी कार्यरत असताना माझा संबंध विविध खाजगी मुद्रणालयांशी आला तो गुमास्ता अन् किमान वेतन कायदा अंमलबजावणी संदर्भात. छोटीमोठी मुद्रणालये आपापला व्यवसाय करून अल्पसंतुष्टच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मळ्यात एक छोटेसे मुद्रणालय होते. मालक व दोन कामगार. हँड कंपोझिंग असलेल्या या छोट्या आस्थापनात हँड बिले, नाटकांच्या जाहिराती तसेच इतर छपाई अशी नगण्य कामे होत. मळ्यात फर्नांडिस उद्योग समूहाची पण दोन मुद्रणालये होती. अजूनही असतील. याच परिसरात ‘हळदणकर प्रिंटिंग प्रेस’ होते. आमंत्रण पत्रिका छापण्यासाठी सुप्रसिद्ध. यांचे वास्तव्य पर्वरीला. चोख कामासाठी हे मुद्रणालय सुप्रसिद्ध. कॅफे आरामजवळ ‘सदानंद प्रिंटिंग प्रेस’ यांचे मुख्यालय होते. याचे मालक नाईक आमच्या आजोबांचे लायसियममधील वर्गबंधू. निवृत्तीनंतर आजोबांचे हे विरंगुळ्याचे स्थान. कालांतराने येथे नवीन छपाई पद्धत आली. जुने कामगार- ज्यांनी नवीन छपाईपद्धती अंगिकारली ते तरले. या प्रेसच्या कामगार समस्या मी आत्मीयतेने हाताळल्याचे स्मरते. हिंदू फार्मसीच्या डाव्या बाजूला ‘काझ आराउझ’ नावाची पाटी लावलेले स्टेशनरीचे तसेच छपाईचे आस्थापन होते. येथे बहुधा वह्या बांधणी अन् वरच्या पृष्ठावरची छपाई एवढेच काम होत असे. दोरिक ब्रँडच्या वह्यांना त्याकाळी मागणी होती. अशी वह्याबांधणी ‘कॅफे तातो’ यांच्या उपहारगृहाच्या उजव्या बाजूला ‘काझ नाईक’ या स्टेशनरी दुकानात होत असे. येथे पण छपाई यंत्रे असावीत, आता आठवत नाही. झेरॉक्स प्रती काढून देणारे गोव्यातील मला वाटतं हे पहिलेवहिले आस्थापन. तीन ते चार रुपये दराने या प्रती मिळत. परंतु दस्तावेज पुनश्च टंकलिपीत करण्याची पद्धत या झेरॉक्समुळे बंद पडली. ‘काझ नाईक’मधील मिळणाऱ्या मालाचा दर्जा उत्तम असे. या आस्थापनाच्या उजव्या बाजूला एक अरुंद रस्ता पणजी चर्चकडे जातो. येथेच प्रोग्रेस हायस्कूल कार्यरत आहे. याच्या बाजूला ‘सेंट्रल प्रिंटिंग प्रेस’ हे मुद्रणालय होते. सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. दत्ता गायतोंडे यांच्या वडिलांनी थाटलेले हे मुद्रणालय, त्यांच्या चिरंजिवानी आर्थिक प्राप्तीची शक्यता नसताना मोठ्या जिकिरीने चालवले. दिवंगत गायतोंडे फार्मसी कॉलेजातील प्राचार्य. परंतु यांनी पण या मुद्रणालयासाठी खस्ता खाल्ल्या. आपल्या तीर्थरूपांची ‘सासाय’ जपण्यासाठी. कामगारांना किमान वेतन देणे यांना मुष्कील व्हायचे. परंतु डॉ. दत्ता गायतोंडे हे कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारे. यास्तव पदरचे पैसे मोडून पण कामगारांचे वेतन दिले जात असे. शांता बिल्डिंग, सांतईनेजच्या उजव्या प्रवेशदारावर पाणंदिकरांचे अद्ययावत यंत्रणा असलेले मुद्रणालय होते. पाणंदीकर देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले. ग्राहकांशी सलोख्याचे संबंध राखणारे. यामुळे यांना स्मरणिकांच्या ऑर्डर्स पण मिळत. ‘फोटो आर्ट गणेश’ या सेंट्रल प्रिंटिंग प्रेस इमारतीच्या मजल्यावर असलेल्या फोटोग्राफी स्टुडिओच्या मालकाने ‘केदार प्रिंटिंग प्रेस’ हे मुद्रणालय डॉन बॉस्को स्कूलच्या समोर उघडले होते. परंतु कामगार समस्येमुळे अथवा अन्य कारणांमुळे ते अल्पजीवी ठरले. जुन्ता हाऊससमोर ‘बी. के. प्रिटिंग प्रेस’ होते. याचे मालक मित्रा बीर अन् त्यांचे बंधू काकोडकर. मित्रा बीर या स्वातंत्र्यसेनानी अन् माजी आमदार माधव बीर यांच्या सुविद्य पत्नी. त्या अपघातात गेल्या अन् त्यांच्या बंधूनी म्हणजे काकोडकरांनी वकिली पेशा स्वीकारला. तरी पण हे मुद्रणालय कंत्राटी भाडेतत्त्वावर चालूच होते. रायबंदर येथे इस्पितळाच्या मागच्या बाजूला ‘सह्याद्री प्रिंटिंग प्रेस’ हा छापखाना होता. कालांतराने याचे स्थित्यंतर खोर्ली- तिसवाडी येथे झाले. माझे ‘अंतर्नाद’ हे पुस्तक येथेच मुद्रित झाले. बऱ्याच काळानंतर मालकांशी पुनर्भेट झाली. कोर्तिमच्या उतरंडीवर डाव्या बाजूला असणारे ‘पॉप्युलर प्रिंटिंग प्रेस’ पोर्तुगीज राजवटीत कार्यरत होते, ते अजूनही चालू आहे.
आज पणजी विस्तारली आहे. गरजेनुसार पदोपदी अत्याधुनिक यंत्रणा असलेली मुद्रणालये आली आहेत. ग्राहकांना तत्पर सेवा मिळू लागली आहे. मुद्रणाच्या विविध पद्धती आल्या. आकर्षित बॅनर प्रिंटिंग आले. ग्राहकांच्या आशा-आकांक्षा आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या. परंतु आजची छपाई यंत्रणा ही आव्हाने पेलते आहे. नवववीन संशोधित पद्धती आणल्या जात आहेत. परंतु पणजीतील मुद्रणाचा इतिहास विसरून कसे चालेल?