पणजी शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांच्या हॉटमिक्सिंग डांबरीकरणाचे काम येत्या १५ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
वीज खाते, पाणीपुरवठा खाते व गॅस कंपनीने वरील नऊ रस्त्यांवर आपले केबल्स घालण्यासाठीचे खोदकाम यापूर्वीच पूर्ण केले आहे. उर्वरित रस्त्यांवरील खोदकामही या खात्यांना विनाविलंब पूर्ण करण्याची सूचना पणजी महापालिकेने केली असल्याचे मडकईकर म्हणाले.
वरील नऊ रस्त्यांवर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वीच संबंधीत कंत्राटदारांना ‘वर्क ऑर्डर’ दिली असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले.
पुढील तीन वर्षे खोदकाम नाही
पणजीतील रस्त्यांचे एकदा डांबरीकरण झाले की पुढील तीन वर्षे या रस्त्यांवर कुणालाही खोदकाम करता येणार नाही. वीज खाते, पाणीपुरवठा खाते, गॅस कंपन्या आदींना पणजी महापालिकेने तसे कळवले असल्याचे मडकईकर यानी सांगितले.
खरे म्हणजे पावसाळा संपल्यानंतर ताबडतोब आम्ही पणजी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेणार होतो पण विविध खात्यांना या रस्त्यांवर आपले केबल्स घालण्यासाठी खोदकाम करायचे असल्याने आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला हे काम होईपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण न करण्याची सूचना केली. त्याचबरोबर ज्या खात्यांना या रस्त्यांवर केबल्स घालायचे आहेत त्यांना आपले काम लवकर हाती घेऊन ते पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानुसार या खात्यांनी शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवरील काम आतापर्यंत पूर्ण केले आहे. अन्य रस्त्यांवरील कामही वेगाने पूर्ण करण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले.