पणजी महानगरपालिकेच्या पे पार्किंग निविदेतील बोली रकमेच्या ५० टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्याच्या अटीमुळे पे पार्किंगच्या कार्यवाहीमध्ये तूर्त अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पे पार्किंगसाठी ठेकेदाराने दीड कोटी रुपयांची बोली लावलेली आहे. त्याला ५० लाख रुपयांची सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर निविदेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारी आयुक्तांना देण्यात आला आहे.
दरम्यान ठेकेदाराने सुरक्षा ठेव जमा न केल्यास पे पार्किंगची कार्यवाही एप्रिल- मे महिन्यापर्यंत लांबणीवर पडू शकते, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी बैठकीत बोलताना दिली.
पणजी महानगरपालिकेने पे पार्किंगसाठी तीन वर्षांसाठी निविदा जारी केली. या निविदेसाठी दोन ठेकेदारांनी बोली लावली. सर्वाधिक दीड कोटी रुपयांची बोली लावलेल्या ठेकेदाराला निविदा देण्याबाबत सोपस्कार करण्यात आले. या ठेकेदाराने सोपस्कार पूर्ण करण्यासाठी प्रथम बोलीच्या ५० टक्के सुरक्षा ठेव जमा करणे आवश्यक आहे. ठेकेदाराला ५० लाख रुपये सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक महिन्याला साडे चार लाखांचा हप्ता भरावा लागणार आहे. एवढी मोठी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करणे शक्य नसल्याने ठेकेदार माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.