काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी व समर्थकांनी येथील आझाद मैदानावर ‘मौन सत्याग्रह’ केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ‘मौन सत्याग्रह’ करण्यात येत आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजप सरकारने देशातील लोकशाहीची हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्यानेच त्यांना संसदेतून अपात्र करण्यात आले आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
राहुल गांधींवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जनतेचा आवाज दाबत आहे, असा दावा आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केला. यावेळी ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ नेते शंभू बांदेकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, अमरनाथ पणजीकर, सुभाष फळदेसाई, तुलिओ डिसोझा, एव्हर्सन वालेस, ऑर्विल दोरादो, विरिएटो फर्नांडिस, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, मोरेन रिबेलो, वरद म्हार्दोळकर, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, जयदेव प्रभुगावकर, नियाजी शेख आदी उपस्थित होते.