पणजीतील अपघाताची चौकशी चालू : रॉड्रिग्स

0
14

स्मार्ट सिटीच्या चालू असलेल्या कामामुळे मळा येथे झालेल्या एका दुचाकी अपघातात एका युवकाचा बळी जाण्याची जी घटना घडली, त्या प्रकरणी चौकशी चालू आहे, अशी माहती काल स्मार्ट सिटी पणजीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. येत्या काही दिवसांत चौकशी अहवाल तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामामुळे जेथे हा अपघात घडला, तेथे सुरक्षेसंबंधीचे कोणतेही उपाय करण्यात आले नव्हते हे खरे नव्हे, असे रॉड्रिग्स म्हणाले. जेथे अपघात घडला तेथेही सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आली होती; पण आपणाला त्यासंबंधी अधिक काही बोलायचे नाही. आपण चौकशी अहवालाच्या प्रतीक्षेत असून, त्यानंतर यासंबंधी सविस्तरपणे बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपघात घडला त्याठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आली होती; मात्र ती पुरेशी नव्हती असे असू शकेल. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतरच खरे काय ते कळू शकेल. स्मार्ट सिटीचे ज्या ज्या ठिकाणी काम चालू आहे, तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना हवी तशी नसून त्यात वाढ करायला हवी असे चौकशी अहवालातून स्पष्ट करण्यात आल्यास त्यानुसार आवश्यक तशी उपाययोजना करण्यात येईल, असेही रॉड्रिग्स पुढे म्हणाले. मानवी हक्क आयोगाने याप्रकरणी आम्हाला नोटीस बजावलेली असल्याने चौकशी अहवाल हाती आल्यानंतर आम्ही त्यांच्या नोटिसीला उत्तर देणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.