पणजीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

0
83

पणजी शहरात होणारी वाहतुकीची कोंडी नाहीशी करण्यासाठी पणजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्वावर काही बदल घडवून आणण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला असल्याचे या विभागाचे उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
फोंडा, रायबंदर, जुने गोवे, चिंबल, मडगाव व दक्षिण गोव्यातील अन्य भागात जाणार्‍या वाहनांना जुन्या पाटो पुलावरून दिवजां सर्कलच्या बाजूने जाण्यास दिले जाणार नाही. ही वाहने पर्यटन भवनाकडून ईडीसी प्लाझाच्या बाजूने कदंब सर्कलच्या दिशेने वळवण्यात येतील तसेच जी वाहने मडगांवच्या बाजूने येतील व ज्याना म्हापशाच्या बाजूने जायचे असेल त्यांना जुन्या मांडवी पुलावरून जाण्यासाठी किंग फिशर सर्कलच्या बाजूने जाता येणार नाही. त्यांना म्हापशाला जाण्यासाठी नव्या मांडवी पुलावरून जावे लागेल. प्रायोगिक तत्वावर हा बदल करण्यात आलेला आहे. वरील ठिकाणी वाहतुकीची होणारी कोंडी व पुन्हा पुन्हा जी वाहतूक अडवून धरावी लागते त्यात या बदलामुळे सुधारणा होत असल्याचे दिसून आल्यास हा बदल कायम करण्यात येईल, असे आंगले यांनी स्पष्ट केले. हा बदल येत्या दोन दिवसांपासून लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील मुंबई बस स्थानकही तात्पुरता अन्य ठिकाणी हलवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.