पणजी शहराच्या मध्य भागातील मलनिस्सारण वाहिनीचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पणजी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
रॉड्रिग्स यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा काल घेतला. 19 फेब्रुवारीला पणजीतील मलनिस्सारण वाहिनीचे सुमारे 76 टक्के मॅनहोल बांधण्याचे काम, फॉन्टेनहास भागात 96 टक्के, मळा भागात 88 टक्के आणि सांतइनेज भागात 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी जवळपास 35 मॅनहोल टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एकूण 74 मॅनहोलचे काम अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.
पणजीतील रस्त्यालगतच्या पदपथावरील अतिक्रमणांनी एक मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कामाच्या गतीवर विपरित परिणाम झाला आहे. दर महिन्याला 20 ते 25 मॅनहोल्स पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आम्ही पाळले, तर आम्ही 31 मे पर्यंत पणजीतील मॅनहोल्स आणि मलनिस्सारण वाहिनीचे काम पूर्ण करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांतइनेज येथे रस्त्यामध्ये येणारी दोन झाडे हटविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.