दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर पणजी मतदारसंघाची पोट निवडणूक घेण्यार्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा येथील मतदारांवर प्रभाव पडू शकेल हे पटण्याजोगे असल्याने यासंबंधी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे. त्यामुळे मतमोजणीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे, असे संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल सांगितले.येथील कार्यालयातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे येथील स्थानिक पक्षाने केलेल्या तक्रारींची माहितीही दिल्लीला दिली असून आयोगाच्या आदेशाची आपण प्रतीक्षा करीत असल्याचे ते म्हणाले.
पणजी मतदारसंघाची पोट निवडणूक दि. १३ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. व १६ रोजी मतमोजणी होईल. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १० फेब्रुवारी निश्चित केली आहे. केवळ पणजी मतदारसंघातील मतदारांवरच नव्हे तर देशातील अन्य काही मतदारसंघामध्ये पोट १३ रोजी निवडणुका होणार असल्याने त्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पोट निवडणुकीची सज्जता
दरम्यान, पोट निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मतदान यंत्रांची तपासणी येत्या २२,२३ व २४ या दिवसात होणार असल्याचे नावती यांनी सांगितले. उत्तर गोव्यात लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या तातडीच्या कामांसाठी वेगवेगळ्या खात्यांकडून परवान्यांसाठी आयोगाकडे अर्ज येत आहेत.