पणजीचे मुख्य मार्केट अद्याप बंदच

0
138

>> पर्यायी जागेत विविध मालाची विक्री

पणजी महानगरपालिकेने भाजी, नारळ, फळांची विक्री पर्यायी जागेत कालपासून सुरुवात केली आहे. महानगरपालिकेने मुख्य मार्केट सुरू केलेले नाही. मार्केट आणि आयनॉक्स दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा भाजी, फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या २२ मार्चपासून पणजीतील मार्केट बंद असल्याने विक्रेत्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहे. नागरिकांनासुध्दा भाजी, फळांसाठी त्रास सहन करावा लागत होता. केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारात वाढ करण्यासाठी शिथिलता दिल्यानंतर पणजी मनपाने मार्केट सुरू न करताना विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या पर्यायी जागेत सामाजिक अंतर राखण्याची सूचना विक्रेत्यांना करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिकेचे कर्मचारीसुद्धा पर्यायी जागेत सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत.

….तर मासळी मार्केटलाही जागा

महानगरपालिकेने पर्यायी जागेत सुरू केलेल्या भाजी, फळे  विक्रीला योग्य प्रतिसाद मिळाल्यास अशाच पद्धतीने मासळीच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्यावर विचार केला जाणार आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर राखण्याची गरज आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात पणजी महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिकांकडून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी घेण्यात आलेले ५०० रुपयांचे शुल्क परत केले जाणार आहेत. महानगरपालिकेने आत्तापर्यत २४ जणांकडून शुल्क घेतले आहे. व्यावसायिकांनी स्वीकारण्यात आलेल्या शुल्काची पावती महानगरपालिका कार्यालयात सादर केल्यानंतर स्वीकारण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

महापौरांनी खरेदी केलेली नवीन आलिशान कारगाडी टीकेचा विषय बनला आहे. नवीन गाडी खरेदीसाठी वेळ चुकल्याची कबुली महापौर मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नवीन गाडी खरेदीसाठी सरकारी परवानगी घेण्यात आली आहे. नवीन गाडी खरेदीवर समाजमाध्यमावर टीका केली जात आहे. टीका करणार्‍यांमध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे असे महापौर म्हणाले.