पणजीचा पार्किंग मास्टर प्लॅन सूचनांसाठी लवकरच खुला

0
75

पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली तयार करण्यात आलेला पणजी शहराच्या वाहतूक व्यवस्थेसह पार्किंग मास्टर प्लॅन येत्या २५ जून रोजी नागरिकांच्या सूचनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे संचालक तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील व्यापारी व नागरिकांना ‘सिटी कार्ड’ वितरित केली जाणार आहेत. या कार्डासाठी कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. सिटी कार्डाचे येत्या ३० जुलै रोजी अनावरण केले जाणार आहे. या कार्डाच्या माध्यमातून वीज, पाणी, महानगरपालिकेच्या शुल्काचा भरणा केला जाऊ शकतो. तसेच खरेदीसाठी कार्डाचा वापर केला जाऊ शकतो, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

रायबंदर वीज समस्या
सुधारण्यासाठी उपक्रम
स्मार्ट सिटी योजनेअर्तंगत रायबंदर येथील विजेची समस्या सोडविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायबंदरमधील वीज पुरवठा सुधारण्यासाठी येत्या १५ जुलै रोजी निविदा जारी केली जाणार आहे, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले.
रायबंदर भागातील नागरिकांना खंडीत वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील विजेची समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक लोकांशी संवाद साधण्यात आला. जुन्या साधनसुविधांमुळे विजेची समस्या निर्माण होत असल्याने भूमिगत वीज वाहिनी घालण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच जुन्या वीज वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर व इतर यंत्रणा बदलण्यात येणार आहेत, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

पणजी महानगरपालिकेसाठी ई. गव्हर्नर सिस्टम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेचा कारभार ‘पेपर लेस’ करण्यात येणार आहे. ही साधन सुविधा तयार करून महानगरपालिकेला सुपूर्द केली जाणार आहे, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रातील गटारांचे सर्वेक्षण करण्याचे काम जलस्रोत खाते, महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. शहरातील काही भागात साचणार्‍या पाण्याचा अभ्यास करून योग्य उपाय योजना हाती घेतली जाणार आहे. रायबंदर आणि पणजी ते ओल्डगोवा या बगलमार्गावरील भागासाठी मलनिस्सारण प्रकल्प तयार केला जाणार आहे. पणजी शहरातील स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यावर विचार केला जात आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.