राज्यात चोवीस तासांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडझडीच्या आणखी 99 घटनांची नोंद झाली असून, सुमारे 20 लाख 54 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्यात मागील दोन दिवसांपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, जोरदार वारे वाहत असल्याने झाडांची पडझड सुरू झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत 1.27 इंच पावसाची नोंद झाली असून, आत्तापर्यंत एकूण 26.09 इंच पावसाची नोंद झाली आहे. धारबांदोडा येथे सर्वाधिक 2.99 इंच पावसाची नोंद झाली. पेडणे येथे 0.72 इंच, पणजी येथे 0.98 इंच, जुने गोवे येथे 1.11 इंच, साखळी येथे 1.44 इंच, फोंडा येथे 1.77 इंच, दाबोळी येथे 1.36 इंच, मुरगाव येथे 0.77 इंच, केपे येथे 1.85 इंच, सांगे येथे 1.87 इंच, काणकोण येथे 1.27 इंच, मडगाव येथे 0.94 इंच पावसाची नोंद झाली.
राज्यातील प्रमुख पडझडीच्या घटनांमध्ये आगशी येथे पिंपळाचे एक मोठे झाड दोन घरांवर पडल्याने सुमारे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले. सिध्देश्वरनगर तिस्क उसगाव येथे एक झाड घरावर पडल्याने 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच, सावरकट्टा कुंकळ्ळी येथे एका निवासी संकुलावर झाड मोडून पडल्याने 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यात दोन दुचाकी आणि पाच सायकलचे देखील नुकसान झाले. कुंकळ्ळीत सर्वाधिक 16 पडझडीच्या घटनांची नोंद झाली. कुडचडे येथे 13, फोंडा येथे 12, डिचोली येथे 11, पर्वरी येथे 8, वाळपई येथे 7, काणकोण येथे 5 झाडाच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली.