भाजप नेत्या तथा महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे काल स्पष्ट केले. मुंडे यांच्या फेसबुक पोस्ट आणि फेसबुक पेजवरून भाजपचे नाव व चिन्ह गायब झाल्यामुळे त्या भाजपचा त्याग करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आता त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला असून भाजप सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
आपण भाजप सोडणार असल्याबाबत अफवा पसरविण्यात आल्या. आपण भाजपची निष्ठावान कार्यकर्ती असून आपल्या रक्तात बंडखोरी नाही असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी फेसबुकवर केलेली पोस्ट दबावतंत्रासाठी केली नव्हती ही बाबही त्यांनी स्पष्ट केली आहे.
मला आत्मचिंतनासाठी वेळ हवी आहे. तसेच मला कोणतेही पद मिळू नये यासाठी प्रयत्न चालल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर पुन्हा कमळ उमलले आहे. मात्र भाजपचे नाव अद्याप दिसत नाही.
दरम्यान, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चानंतर त्यांचे मन वळविण्यासाठी भाजप नेते विनोद तावडे, राम शिंदे व अन्य नेत्यांनी त्यांची काल भेट घेतली.
नीलम गोर्हे यांचे पंकजांबाबत वेट अँड वॉच
शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्ष सोडण्याविषयीच्या चर्चांवर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना या संदर्भात ‘वेट अँड वॉच’ ही भूमिका योग्य ठरेल असे सांगितले.
गोर्हे म्हणाल्या, ‘पंकजा मुंडे व ठाकरे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. २०१४ मध्ये आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरीही पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केलेला नव्हता. त्यामुळे आता आपण १२ डिसेंबरपर्यंत वाट पहाणे योग्य होईल.’