रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांचा इशारा
2022 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांपैकी ज्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या आमदारांविरोधात गणेशचतुर्थीनंतर त्यांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल, असा इशारा रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी काल पेडणे येथे दिला.
मनोज परब यांनी पेडणे येथे होऊ घातलेल्या थीम पार्क प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी काल एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांनी विधानसभेच्या निवडणुकापूर्वी रिव्होल्युशनरी गोवन्सने जे आमदार एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर नंतर दुसऱ्या पक्षात गेले, तर त्यांच्या घरासमोर ठाण मांडून त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता त्याचे काय झाले, असा सवाल मनोज परब यांना केला.
या प्रश्नावर बोलताना मनोज परब यांनी सांगितले की, एक वर्ष आम्ही गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची जी वैयक्तिक कामे आहेत, ती पूर्ण करण्यासाठी वेळ दिला. चतुर्थीनंतर आता आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने तन-मन धन हरपून काम करणार आहे .ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, त्या आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा मुहूर्त गणेश चतुर्थीनंतर निश्चित केला जाईल. त्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्व कार्यकर्ते संघटित होत असल्याची माहिती मनोज परब यांनी दिली.
भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवरील अन्याय रोखण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्स सदैव तप्तर आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने आता आरजीला कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे जे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याबाबत टप्प्याटप्प्याने आवाज उठवला जाईल, असे मनोज परब म्हणाले.
आरजी केवळ मतांसाठी काम करत नाही, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावे, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा, यासाठी कार्यरत असल्याचा दावाही परब यांनी केला.