पंत, कुलदीपची निवड

0
92

>> इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंडविरुद्ध होणार्‍या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काल बुधवारी करण्यात आली. युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला पहिल्यांदाच कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारत ‘अ’ संघाकडून प्रभावी कामगिरी केल्याचे फळ त्याला मिळाले आहे. ‘यो यो’ टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय मालिकेला मुकलेल्या जसप्रीत बुमराहचा केवळ दुसर्‍या व तिसर्‍या कसोटीसाठी विचार करण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पाठदुखी बळावलेल्या भुवनेश्वर कुमारला कसोटी संघात स्थान देण्यात आलेला नाही. तंदुरुस्ती चाचणीनंतरच त्याची निवड करण्यात येईल. निवड समितीने मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरला संघात स्थान दिले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणार्‍या ऋषभ पंतला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. नियमित यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुखापतीतून सावरलेला नसल्याने पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकने संघात स्थान मिळविले आहे. दुसर्‍या यष्टिरक्षकासाठी पार्थिव पटेल व ऋषभ पंत यांच्यात चुरस होती. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात खराब यष्टिरक्षण केल्यामुळे अनुभवी पटेलऐवजी युवा पंतला संधी देण्यात आली आहे. भुवनेश्‍वर कुमारच्या अनुपस्थितीमुळे मुंबईकर शार्दुल ठाकूरला १८ सदस्यीय जंबो संघात स्थान लाभले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बर्मिंघमवर हा सामना होणार आहे. यानंतर लॉडर्‌‌स (९ ऑगस्टपासून), नॉटिंघम (१८ ऑगस्टपासून), साऊथहॅम्पटन (३० ऑगस्टपासून) व ओव्हल (७ सप्टेंबरपासून) या स्थळांवर कसोटी सामने होतील.

पहिल्या तीन कसोटीसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह व शार्दुल ठाकुर.