पंतप्रधान मोदींविरोधात विशेषाधिकारभंगाची तक्रार

0
12

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली आहे. जालंधरचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी लोकसभेच्या महासचिवांकडे ही तक्रार केली आहे. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या तरुण आणि उत्साही सहकाऱ्याचे हे भाषण ऐकलेच पाहिजे. तथ्ये आणि विनोद यांचे परिपूर्ण मिश्रण, जे इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड करते, असे नमूद करत मोदींनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अनेक ‘आक्षेपार्ह टिप्पण्या’ केल्या. नंतर त्या लोकसभा अध्यक्षांनी कामकाजातून त्या काढून टाकल्या. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ठाकूर यांच्या भाषणाचा संपूर्ण भाग ट्विट केला आहे. हे लोकसभेच्या नियमांचे उल्लंघन आहे, असे चन्नी यांनी म्हटले आहे.