पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोत जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी शिखर वार्ता बैठकीत सहभागी होण्यासाठी काल रात्री क्योटोहून दाखल झाले. ते सध्या पाच दिवसांच्या जपान भेटीवर गेले आहेत. आजच्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांबाबत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.
टोक्योत येण्यापूर्वी मोदी एक दिवस क्योटो शहरात होते. तेथे त्यांनी बौद्ध मंदिरांना, क्योटो विद्यापीठास भेट दिली. दरम्यान, भारताच्या आदिवासी पट्ट्यास भेडसावणार्या रक्तक्षयाशी मुकाबल्यासाठी मदतीचे आवाहन मोदींनी स्टेम सेल रिसर्च फॅसिलिटीच्या संशोधकांना केले.
दरम्यान, ६३ वर्षीय मोदी व ५९ वर्षीय अबे यांच्यातील आजच्या शिखर वार्ता भेटीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समझोता होण्याची शक्यता आहे. यात संरक्षण, नागरी अणू ऊर्जा, पायाभूत सुविधा विकास, रेअर अर्थ मटेरियल्स यांचा समावेश आहे. दरम्यान, बुद्ध मंदिरांना भेटीवेळी जपानचे पंतप्रधान त्यांच्यासोबत होते. भारतीय शहरांचा विकास करण्यासाठी विकासाचे ‘क्योटो मॉडेल’ हवे असे उद्गार मोदी यांनी काढले. इतिहास, परंपरा, संस्कृती जपून क्योटो शहराचे आधुनिकीकरण करण्यात आल्याबद्दल मोदींनी प्रशंसोद्गार काढले.