काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेत्यांविरुद्ध येथील निवडणूक आयोगाकडे काल तक्रार दाखल केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची भेट घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री व इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दिगंबर कामत आणि पक्षाचे इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांची नावेही तक्रारीत नमूद केली आहेत.