पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत ८४ देशांचा दौरा केला असून त्यावर सरकारने १४८४ कोटी रूपये एवढा खर्च केला असल्याची माहिती राज्यसभेत विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी काल एका प्रश्नावर दिली.
याविषयी तीन भागांत विभागणी करत एकूण किती खर्च पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौर्यांवर आला त्याची माहिती देण्यात आली. चार्टर्ड विमाने, विमानांची देखभाल आणि हॉटलाईन यावर मिळून हा खर्च असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यसभेत मंत्री सिंह यांनी सादर केलेल्या माहितीनुसार १५ जून २०१४ ते १० जून २०१८ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान देखभालीवर एकूण १०८८.४२ कोटी रूपये व चार्टर्ड विमानांवर ३८७.२६ कोटी रूपये खर्च झाले आहेत. हॉटलाईनसाठी एकूण ९.१२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांनी २०१५-१६ या काळात सर्वाधिक २४ देशांचा दौरा केला. २०१७-१८ मध्ये १९ देशांचा आणि २०१६-१७ मध्ये १८ विदेश दौरे केले आहेत.
२०१४-१५ मध्ये मोदींनी १४ विदेश दौरे केले. पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचा सर्वप्रथम दौरा होता भूतानचा. तर २०१८ साली आतापर्यंत मोदींनी १० देशांचा दौरा केला असून त्यातील सर्वात शेवटचा दौरा होता चीनचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या दौर्यांच्या माध्यमातून व्यापार, विदेशी गुंतवणूक व अन्य महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विविध देशांशी सहकार्यासाठी करार केले असल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे.