जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील ‘झेड मोढ’ बोगद्याभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सोमवार दि. 13 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभानंतर मोदींची एक सार्वजनिक सभा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधानांसाठी असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) कर्मचाऱ्यांनी या भागाचा ताबा घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. ड्रोनद्वारे हवाई आणि तांत्रिक देखरेख केली जात असून शोधपथके तसेच गस्तही वाढवण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील ‘झेड मोढ’ बोगद्यासाठी 2,400 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 6.5 किमी लांबीचा हा बोगदा असून त्यामुळे श्रीनगर ते लडाख हा मार्ग बाराही महिने खुला राहील.