पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

0
7

>> फातोर्डा स्टेडियमवर रंगणार भव्यदिव्य सोहळा; स्पर्धेत देशभरातील 10 हजार क्रीडापटू घेणार भाग

फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडिममध्ये आयोजित एका भव्य सोहळ्यात आज 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. राज्यात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असून, आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण गोवा सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सायंकाळी 4 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान स्पर्धेत सहभागी क्रीडापटूंना संबोधित करतील. यावेळच्या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 43 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला असून, 28 ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 10 हजार क्रीडापटू भाग घेणार आहेत. दरम्यान, आजच्या उद्घाटन सोहळयाला केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येण्यापूर्वी शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानला भेट देणार आहेत. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गोव्यात दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

गुरुवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सुमारे 7 हजार प्रेक्षक, 5 हजार विद्यार्थी व 2 हजार क्रीडापटूंची उपस्थिती असेल. या सोहळ्याला अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिसा या राज्यांचे क्रीडामंत्री, तसेच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आदी उपस्थित असतील.
यावेळी पंतप्रधानांसमोर प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांचे संचलन होईल. तसेच पंतप्रधानांच्या भाषणानंतर 600 कलाकारांचा राष्ट्रीय एकात्मतेवरील बहारदार कार्यक्रम होईल. यावेळी पार्श्वगायक सुखविंदर सिंग व गोव्याची सुकन्या हेमा सरदेसाई यांच्याही गायनाचा कार्यक्रम होईल.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमला आकर्षकरित्या सजवण्यात आले आहे. काल दिवसभर ह्या स्टेडियमवर उद्घाटन सोहळ्याची पूर्वतयारी जोरात सुरू होती. या तयारीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आढावा घेतला.

वाहतुकीवर परिणाम नाही : पोलीस
फातोर्डा स्टेडियमवरील उद्घाटन सोहळ्याला हजर राहण्यासाठी अतिमहनीय व्यक्तींचे पणजी-मडगाव महामार्गावरून ये-जा होणार असली, तरी त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणार नसल्याचे वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी स्पष्ट केले. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. काही वाहने वेगळ्या मार्गावरुन वळवण्यात येणार आहे. या मार्गावर वाहतुकीची व्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल 800 पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. ज्या मार्गावरुन अतिमहनीय व्यक्ती प्रवास करणार आहेत, त्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत केवळ 5 ते 9 ह्या दरम्यान परिणाम होणार आहे. अतिमहनीय व्यक्तींचे आगमन व प्रस्थान याच्या केवळ अर्धा तासापूर्वी रस्ते अडवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांना आज अर्ध्या दिवसाची सुट्टी
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे मडगाव शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आज दुपारी 1 वाजल्यापासून सर्व सरकारी कार्यालये बंद करण्यात येणार आहेत, असे गोवा सरकारचया सर्वसामान्य प्रशासन खात्याने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या खात्यांची कार्यालये मात्र खुली राहणार आहेत.