पंतप्रधानांच्या माफीची विरोधकांकडून मागणी

0
107

संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
अल्पसंख्यकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागावी या मागणीसाठी सर्व विरोधी पक्षांनी काल जोर धरला. दरम्यान, याच प्रकरणावरून काल दुसर्‍या दिवशीही राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ माजवला. मात्र त्यानंतरही संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ज्योती यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या असंस्कृत वक्तव्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणी मतप्रदर्शन करताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ म्हणाले, ‘बर्‍याच काळानंतर पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित होते. या वादग्रस्त प्रकरणी त्यांनी उभे राहून खेद व्यक्त करण्यासह वक्तव्याचा निषेध करायला हवा होता.’ वादग्रस्त वक्तव्यामुळे धर्मनिरपेक्षता मानणार्‍या लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचे ते संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. संबंधित मंत्र्यांनी माफी मागितली असल्याने गुन्ह्याची ही कबुली ठरते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
समाजवादी पक्षाचे नेते राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी याप्रकरणी मंत्र्यांचा राजीनामाच हवा असे मत व्यक्त केले. संबंधित मंत्र्यांचे वक्तव्य हे संसदेबाहेर होते, असा दावा सरकारतर्फे केला जात आहे. परंतु आम्ही संसदेत लोकहिताच्या विषयांवर चर्चा करत असतो असे यादव म्हणाले. संबंधित मंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्‍वासन पंतप्रधान जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही’ अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार अश्‍वानी कुमार यांनी व्यक्त केले.
मोदींनी माफी मागावी : ओमर
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे. काश्मीर हे मुस्लिम बहुसंख्य असलेले राज्य आहे आणि आता त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यानेच आमच्या सारख्यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. मोदी श्रीनगरमध्ये सभाही घेणार असल्याने त्यांनी काश्मीरी जनतेची माफी मागावी असे अब्दुल्ला म्हणाले.
राजीनाम्याचा प्रश्‍नच नाही : व्यंकय्या
दरम्यान, साध्वी निरंजन ज्योती यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी धुडकावून लावली. उलट विरोधक संसदेचे कामकाज बंद पाडीत असल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच याआधी यूपीए सरकारमधील मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी व मुलायमसिंग यादव यांच्याविरुद्ध वापरलेल्या शब्दप्रयोगांबद्दलही त्यांनी आठवण करून दिली.