काश्मीर खोर्यामध्ये पुन्हा एकवार दहशतवादी बिगर काश्मिरींना लक्ष्य करू लागलेले दिसतात. गेल्या रविवारी चार ठिकाणी असे हल्ले झाले. दोन बिहारी मजूर, दोन पंजाबी शीख आणि एका काश्मिरी पंडिताला या वेगवेगळ्या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या विषयाकडे देशाचे वेधलेले लक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच काश्मिरी पंडितांच्या ‘नवरेह’ या वर्षारंभ उत्सवात सहभाग घेऊन पंडितांच्या घरवापसीचा केलेला संकल्प या पार्श्वभूमीवर हे हल्ले सुरू झाले आहेत हे उघड आहे. २०११ साली आपण काश्मिरी पंडितांच्या ‘हेरथ’ म्हणजे शिवरात्रीच्या उत्सवात सहभागी झालो होतो, तेव्हा पंडितांनी खोर्यात परत जाण्याच्या शपथा घेतल्या होत्या, परंतु तेव्हा योग्य वेळ आलेली नव्हती. आता ती योग्य वेळ आलेली आहे असे सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमातील भाषणात सांगितले होते. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी अवघा देश उभा राहतो आहे हे पाहून अस्वस्थ झालेले आणि हे पंडित पुन्हा खोर्यात परतू लागतील या आशंकेने अस्वस्थ झालेले दहशतवादी खोर्यामध्ये बिगर काश्मिरींविरुद्ध मोठा हिंसाचार माजवू पाहात आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. नव्वदच्या दशकात जे झाले ते तर घडून गेले. आता केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या खंबीर सरकारने काश्मीरमधील या देशद्रोही वळवळीचा पुरता बंदोबस्त करून खोर्यातील बिगर काश्मिरींच्या सुरक्षिततेसाठी तत्पर प्रयत्न करावे लागतील आणि ते करण्यात सरकार मागे हटणार नाही असा विश्वासही देशवासीयांना आहे. काश्मीरचे विशेषाधिकार हटवून मोदी सरकारने खर्याखुर्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी जे धाडसी पाऊल उचलले ते निश्चितपणे काश्मीरच्या भवितव्याविषयीच्या अपेक्षा वाढविणारे होते. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सातत्याने राबवलेल्या मोहिमांतून खोर्यातील हल्ले बर्याच मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले. मुख्य म्हणजे दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या आर्थिक नाड्या एनआयएमार्फथ आवळून त्यांची रसद तोडण्यासाठी भारत सरकारने व्यापक प्रयत्न केले. हवालाच्या मार्फत दहशतवाद्यांची खातिरदारी करणार्या व्यापार्यांच्या अगदी दिल्लीपासून श्रीनगरपर्यंत नाड्या आवळण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या गोंडस चेहर्याआडून भारतातील देशविरोधी कारवायांची आणि खोर्यातील दगडफेक्यांची पाठराखण करणार्यांची आर्थिक तपासणी होऊन परत पाठवणीही झाली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ खोर्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्याचे, त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे व्यापक प्रयत्न झाले. ज्या पाकिस्तानकडे डोळे लावून काश्मिरी युवक आजवर चुकीच्या मार्गाला लागत होते, तो पाकिस्तान आज राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला दिसतो आहे. अशावेळी केंद्र सरकारच्या नानाविध प्रयत्नांना खोर्यातील नवी पिढी साथ देईल या भीतीने तेथील भारतद्वेष्ट्या शक्तींना ग्रासलेले आहे. त्यातच काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्याने आणि केंद्रातील सरकार त्यासाठी पावले टाकण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही हे स्पष्ट दिसत असल्याने बिगर काश्मिरींना लक्ष्य करण्याचे हे भ्याड प्रयत्न सुरू झाले आहेत.
नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांचे सर्वस्व हिरावून घेतले गेले. त्यांची घरेदारे लुटली गेली, जमिनी बळकावल्या गेल्या. त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी अत्याचार केले, त्यांची पाळेमुळे खणून काढून जबर कारवाई झाली पाहिजे ही आजही देशभावना आहे. जे काश्मिरी पंडित खोर्यात परतू पाहात आहेत, त्यांच्या भव्य वसाहती उभारून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. खोर्यातील पंडितांच्या पुनर्वसनासाठी मट्टणसारख्या ठिकाणच्या वसाहतींमध्ये पंडित समुदाय न परतल्याने त्या लष्कराच्या ताब्यात असल्याचे दिसते. सुरक्षेची खातरजमा मिळाल्याखेरीज पंडित समुदाय खोर्यात कसा परतू शकेल? त्यामुळे त्यांना हा दिलासा मिळवून देण्यासाठी मुळात हे जे कोणी भ्याडपणे लपून छपून हल्ले चढवून पसार होत आहेत, त्यांच्याविरुद्ध कठोर मोहीम राबवण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पुन्हा डोके वर काढण्याची संधी मिळता कामा नये. अशा हल्ल्यांच्या घटना क्षुल्लक व तुरळक न मानता त्यामागे असलेले एक घातक उद्दिष्ट लक्षात घेऊन मोठी मोहीम सरकारला लष्कराच्या मदतीने उघडावी लागेल. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना असलेली आडकाठी निकाली काढून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क आणि सुरक्षा पुरविण्याची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारावी. बंदुकीच्या धाकावर खोर्याबाहेर जा म्हणून सांगण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत हे खोर्यातील देशद्रोही शक्तींना आता कळायलाच हवे!