पंजाबातील तुरुंगातून अतिरेक्यासह पाच कैदी फरार

0
97

>> कारागृहावर सशस्त्र हल्ला

>> खलिस्तानी अतिरेकी हरमिंदर सिंग मिंटूचे पलायन

पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील नाभा कारागृहावर सशस्त्र हल्लेखोरांनी काल सकाळी हल्ला चढवून नंतर खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हरमिंदर सिंग मिंटू या कुख्यात अतिरेक्यासह पाच कैद्यांना घेऊन पलायन केले. यामुळे पंजाब हादरले असून सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कैद्यांना पळून जाण्यात मदत करणार्‍या आरोपींपैकी परमिंदर सिंह याला पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली आहे.
काल सकाळी १० च्या सुमारास आलेल्या दहा हल्लेखोर फिल्मी स्टाईलने नाभा तुरुंगात घुसले. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हल्लेखोर पोलिसांच्या पोषाखात आले होते. त्यांनी दोघा जणांना बेड्या ठोकल्या होत्या. यामुळे पोलीस अधिकार्‍यांना ते पोलीस असल्याचे वाटले. तुरुंगात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी शंभरपेक्षा अधिक गोळ्या झाडल्या. तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांमध्ये गुरप्रीत सिंग, विकी गोंदरा, नितीन देओल व विक्रमजीत सिंग यांचा समावेश आहे.
केंद्राने अहवाल मागविला
नाभा कारागृहातील प्रकारानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी चर्चा करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पंजाबमधील सर्व कारागृहांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचनाही राजनाथ यांनी केली आहे. वरील घटनेसंदर्भात राजनाथ यांची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुमारे १५ मिनिटे दूरध्वनीवर बातचीत झाली. यावेळी आरोपींना पकडण्यासाठीच्या तपासाची माहिती बादल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. दोन दिवसांपूर्वी राजनाथ सिंग यांनी हैदराबादमधील पोलीस संमेलनात पंजाब व अन्य राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेला सतर्क राहण्यास सांगितले होते.
वरिष्ठ अधिकारी निलंबित
दरम्यान, कारागृहावरील हल्ल्यानंतर पंजाब सरकारने कारागृहाच्या महासंचालकांसह इतर अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी पोलीस महासंचालकांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तीन दिवसांत तपास पूर्ण करून गृह सचिवांकडे अहवाल सुपूर्द करण्याची सूचना बादल यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशात एकास अटक
नाभा कारागृहावर हल्ला करून दहशतवाद्यासह कैद्यांना पळून जाण्यात मदत करणारा आरोपी परमिंदर सिंह याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील शामली येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे व दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी परमिंदरने नाभा तुरुंगातून पलायन केले होते.